www.24taas.com, जळगाव
राज्यभर वाळू उपसा बंद असताना जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातील नद्यांमधून उघडपणे वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे नायब तहसीलदाराच्या हप्तेखोरीमुळं अमळनेर तहसील कार्यालयाचं पितळ उघडं पडलंय.
रविवारी सुटी असूनही नायब तहसीलदार अशोक जगदेव हे मद्यधुंद अवस्थेत बोरी पात्रात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेले. मात्र त्याठिकाणी जाऊन त्यांनी प्रत्येकी 1000 रुपये घेऊन 2 ट्रक्स सोडून दिले. एका छोट्या वाहन चालकाकडूनही त्यांनी पैशांची मागणी केली. पण या वाहन चालकानं पैसे देण्यास असमर्थता दाखवल्यानं जगदेव यांनी उलट्य़ाबोंबा सुरू केल्याचा आरोप या वाहन चालकानं केलाय.
विशेष म्हणजे जगदेव यांनी या वाहनचालकाविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. त्यांना मद्यधुंद अवस्थेत पाहून पोलिसांनी त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. पण सरकारी रुग्णालयात गेल्यानंतर पितळ उघडं पडण्याच्या भीतीनं नायब तहसीलदारांनी तिथून पळ काढला. याप्रकरणामुळं मात्र अमळनेर तहसील कार्यालयात हप्तेखोरी सुरू असल्याचं पुढं आलंय.