www.24taas.com, झी मीडिया, नाशिकहून योगेश खरेसह संजय पवार, झी मीडिया, सोलापूर
कांद्याने सध्या सगळ्यांचाच वांदा केलाय... कांद्याच्या किंमती भडकल्यानं ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलंय... मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळं कांद्याची भाववाढ झाल्याचं तर्कशास्त्र कृषीमंत्री शरद पवार मांडतायत... पण भाववाढीचा फायदा आम्हाला मिळत नाही, ही शेतक-यांची व्यथा आहे.. मग मधल्या मध्ये अडते आणि दलाल ग्राहकांना लुटतायत का..? पाहूया हा रिपोर्ट...
कांद्याच्या भाववाढीनं सध्या सगळ्यांनाच रडवलंय... एक किलो कांद्यासाठी ग्राहकांना 70 ते 75 रूपये मोजावे लागतायत... कांद्याचे भाव अचानक एवढं वाढण्याचं कारण काय..? केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कांद्याच्या भाववाढीचं तर्कशास्त्र मांडलंय... गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांनी टँकरचं पाणी देऊन कांदा जगवला... आता उत्पादन आणि मागणी यांच्यातली तफावत वाढल्यानं भाववाढ झाली, असं पवार म्हणतायत....
कांद्याच्या भाववाढीचा फायदा शेतक-यांना होतोय, असं पवारांना सुचवायचंय का? मग पवारसाहेब, या भाववाढीचा पैसा शेतक-यांच्या खिशात जायला हवा ना...? प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही.
मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की भाव वाढतात, हे खरे असले तरी कांद्याच्या बाबतीत कृत्रिम भाववाढ होतेय, हे नाकारता येणार नाही. कारण
1 जुलैला 9515 क्विंटल कांद्याला 1747 रूपये भाव होता. 9 जुलैला 12,850 क्विंटलला 2116 रूपये, 25 जुलैला 9534 क्विंटल कांद्याला 2388 रूपये, 7 ऑगस्टला 8000 क्विंटल कांद्याला 3026 रूपये तर 12 ऑगस्टला 12000 क्विंटल आवक असताना भाव मात्र 4591 रूपये एवढा होता.
म्हणजे 12 ऑगस्टला आवक वाढल्यानंतर भाव कमी व्हायला हवा होता. पण प्रत्यक्षात तो तीनशे पटींनी वाढला. या भाववाढीमागे अडते आणि दलालांची लॉबी काम करत असल्याचा संशय आहे.
भाववाढीच्या या सगळ्या हेराफेरीत घाटा होतोय शेतकरी आणि ग्राहकांचा... आणि वाटा जातोय अडते आणि दलालांच्या खिशात... यांत बाजार समित्या काय करतात, सरकारचा पणन विभाग काय करतो हा प्रश्नच आहे... अशावेळी कृषीमंत्री दुष्काळाकडे बोट दाखवून वस्तुस्थितीकडे पाठ फिरवत असतील तर कांदा ग्राहक आणि शेतक-यांना आणखी रडवणार, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.