www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
त्र्यंबकेश्वरमध्ये आता महादेवाच्या दारात गरीब श्रीमंत हा भेदभाव लवकरच बंद होणार अशी चिन्हं आहेत. भाविकांचं धावपळीचं जीवनमान एनकॅश करत मंदिर ट्रस्टनं पेड दर्शन सुरू केलं होतं, पण आता हे पेड दर्शन ताबडतोब बंद करावं, अशी नोटीस पुरातत्व विभागानं बजावलीय.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्य़ंबकेश्वराच्या दर्शनासाठी वर्षभर भविकांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत पैसे कमावण्याची शक्कल देवस्थान ट्रस्टला सुचली आणि श्रावण महिन्यापासून व्हीआयपी दर्शनसाठी २०० रुपये आकारायला सुरुवात झाली. गेल्या चारपाच महिन्यात पेड दर्शनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा झलेत. मात्र आत हे पेड दर्शन बेकायदेशीर आहे, आणि ते तात्काळ बंद करण्याची नोटीस पुरातत्व विभागाने बजावलीय.
त्र्यंबकेश्वराचं मंदिर प्राचीन असल्यानं कायद्यानुसार त्याला संरक्षित स्थळाचा दर्जा देण्यात आलाय. कुठल्याही केंद्रीय संरक्षित स्थळाला व्हीआयपी पास देवून पैसे आकारता येत नाहीत. मात्र व्हीआयपी पास देवून निधी गोळा करण्यावरून विश्वस्त मंडळातच दोन मतप्रवाह आहेत.
पेड दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या रांगेतून थेट मंदिरात प्रवेश मिळत असल्यानं सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. आता पुरातत्व विभागाच्या नोटीशीनंतर पेड दर्शन कधी बंद होणार, याकडे भाविकांचं लक्ष लागलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.