राज ठाकरेंनी दिला भाजपला इशारा

माझ्या पक्षाबाबत चर्चा करून नका अन्यथा माझ्याशी झालेली इतर चर्चाही उघड करेल असा गर्भित इशारा आज राज ठाकरे यांनी दिला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 24, 2013, 07:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
माझ्या पक्षाबाबत चर्चा करून नका अन्यथा माझ्याशी झालेली इतर चर्चाही उघड करेल असा गर्भित इशारा आज राज ठाकरे यांनी दिला. वर्तमानपत्रात चर्चा करण्यासाठी अशा पद्धतीने जे काही चौथ्या भिडूबाबत नेहमी बोलत असतात त्यांनी ते बंद करावे असे सांगत त्यांनी यापुढे महायुतीतील भाजपसह सर्वच पक्षांनी आपली तोंडे बंद करण्याचा सल्ला दिला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टीच्या महायुतीमध्ये येणार का, हा प्रश्न सातत्याने चर्चिला जात आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यावरील एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राज ठाकरे यांनी युतीतील घटक पक्षांवर हल्लाबोल केला. माझ्या पक्षामध्ये सगळे निर्णय मीच घेतो. त्यामध्ये बाहेरच्या कोणीही चर्चा करायची गरज नाही. माध्यमांनाही आता या विषयावर चर्चा करू नये, असे राज ठाकरे म्हणाले. याच्यापुढे कोणीही या विषयावर चर्चा केली, तर माझ्याशी काही नेत्यांनी ज्या काही गोष्टींची चर्चा केली आहे, ती उघड करावी लागेल. असेही त्यांनी सांगितले.
मनसेमध्ये सगळे निर्णय मी घेतो. आम्ही काय करायचं, याच्याशी अन्य कुणाचाही संबंध नाही. त्यामुळे महायुतीबाबत मनसेच्या वतीनं बोलायच्या फंदात इतर पक्षांनी पडू नये, असं त्यांनी बजावलं.
शिवसेना-भाजप-रिपाईच्या महायुतीत चौथा भिडू म्हणून मनसेचा समावेश होणार का, यावरून गेले अनेक महिने राज्याच्या राजकारणात तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंकडे टाळी मागितली होती. त्यानंतर महायुतीत चौथा भिडू मनसेबद्दल अनेक चर्चा होत आहे.
मनसेसह सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, मनसे युतीमध्ये आल्यास सत्तेचं गणित सोपं होईल, अशी सूचक विधानं अलीकडच्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.