www.24taas.com, नाशिक
नाशिकरोडसारख्या गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा पडला. आता या घटनेला २४ तास उलटून गेलेत. मात्र अजूनही पोलिसांच्या हाती सुगावा लागलेला नाही. या दरोड्यानंतर ठेवीदारांची झोप उडालीय.
नाशिकरोड परिसरातल्या गजबजलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सलमध्ये मणप्पुरम फायनान्स लिमिटेडच्या याच शाखेवर मंगळवारी संध्याकाळी दरोडा पडला. संध्याकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमाराला दरोडेखोरांचा हैदोस सुरु होता, मात्र बाहेर कुणालाही कानोकान खबर नव्हती. एक दोन जणांनी दरोडेखोरांना येताना पाहिलंही. पण पाच पैकी तिघे पोलिसांच्या वेशात आणि दोघे गुन्हेगार वाटावेत असा ‘गेटअप’ करून आले होते. पोलीसच गुंडांना घेऊन जात असतील, म्हणून लोकांनी दुर्लक्ष केलं. मणप्पुरमच्या कार्यालयात प्रवेश करताच दरोडेखोरांनी सीसीटीव्हीच्या वायर्स कापल्या. कर्मचा-यांचे मोबाईल जप्त केले. कर्मचा-यांना स्ट्रॅग रुममध्ये बंद केलं. जवळपास तीन कोटींचं सोनं आणि लाखो रुपयांची रोकड लम्पास करून दरोडेखोर दिवसाढवळ्या पसार झाले.
या घटनेनंतर लगेच नाकाबंदी करण्यात आली. श्वानपथकं पोहोचली..... पण २४ तास उलटून गेल्यावरही पोलिसांना कुठलाही सुगावा लागलेला नाही. या घटनेमुळे ठेवीदारांना चांगलाच धक्का बसलाय.
मणप्पुरमच्या इतर शहरांतल्या शाखांमध्ये याआधी अशाच प्रकारच्या दरोड्याच्या घटना घडल्यात. त्यांचा आणि या दरोड्याचा काही संबंध आहे का, त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.