www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
हिमालय आणि त्याच्या पायथ्याशी वाहणारी गंगा नदी... ही गंगामाई कशी कोपली आणि तिनं काय विध्वंस घडवला, याची भयाण चित्रं डोळ्यांसमोरुन हलत नाहीत. उत्तराखंडात जसा हिमालय आणि त्याच्या पायांवरुन वाहणारी गंगा, तसंच महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी आणि तिथूनच उगम होणारी गोदामाई. ही दोन चित्रं ठळकपणे दाखवण्याचं कारण म्हणजे जे उत्तराखंडात घडलं ते त्र्यंबकेश्वरातही घडू शकतं.
त्र्यंबकेश्वराच्या पावननगरीत दर्शनासाठी, नारायण नागबळीसाठी हजारो भाविक रोज येतात. महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशातून भाविकांचा ओढा वाढू लागलाय. सहाजिकच हॉटेल्सचा व्यवसाय जोरात आहे. मजल्यांवर मजले चढतायत. भाविकांकडून खो-यानं पैसा मिळतोय. हॉटेल्स आणि धर्मशाळांनी त्र्यंबकेश्वरातला एकही कोपरा सोडला नाही. आता गोदावरीचा उगम असलेल्या थेट ब्रह्मगिरीवरच बांधकामांची चढाओढ सुरु झालीय. डोंगर पोखरुन रस्ते तयार होतायत. पावसाळ्यात मातीचा भराव खाली येतोय. परिणामी धरणांमधली क्षमता कमी होतेय. नैसर्गिक आपत्तीची हीच सुरुवात आहे.
मंदिराच्या आजूबाजूला होणा-या प्रदूषणामुळे आणि दुधाच्या अभिषेकानं मंदिरातल्या मूर्ती तडकू लागल्यायत. स्थानिकांनी कितीही विरोध केला तरी नगरपालिका आणि महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने खुलेआम निसर्गावर अत्याचार होतायत. पुरातत्व विभागानंही यावर चिंता व्यक्त केलीय. जिल्हा प्रशासन मात्र कारवाई करू, एवढंच ठोकळेबाज उत्तर देतंय.
उत्तराखंडातही हिमालयालाच पोखरायला सुरुवात झाली होती. निसर्गाचा गळा घोटल्यावर तो सूड घेणारच..... हे उत्तराखंडाच्या प्रलयानं स्पष्ट केलंय..... अशीच परिस्थिती ब्रह्मगिरीची झाली, तर नंतर आक्रोश करण्यात काहीच अर्थ नाही
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.