www.24taas.com, मुंबई
जगातील कोणत्याही खेळात धावण्याशिवाय पर्याय नाही, तुमच्या क्रिकेटमध्येही रन्स काढायला आणि बॉल अडवण्यासाठी धावणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणूनच प्रत्येकानं धावलंच पाहिजे, असा संदेश भारतात पहिल्यांदाच आलेला आंतरराष्ट्रीय धावपटू ‘हायले गेब्रेसेलासी’नं दिलाय. दहाव्या मुंबई मॅरेथॉनचा हायले ब्रँड अॅम्बॅसेडर आहे. मुंबईतील धावपटूंच्या उत्साहाला वाढवण्यासाठी तो मुंबईत आलाय.
`इधर दौड हैं, उधर दौड हैं, ये जिंदगी यारो दौड हैं...` हे एका हिंदी चित्रपटातलं गाणं असलं तरी जगविख्यात ‘लाँग डिस्टन्स रनर’ म्हणून ओळखला जाणार हायले गेब्रेसेलासीसाठी हे त्याच्या जीवनाचं सत्य आहे. ‘धावणं हेच आपलं जीवन आहे आणि धावण्याव्यतिरिक्त माझ्या डोक्यात कोणताच विचार येऊ शकत नाही’ असं तो आवर्जुन सांगतो. दहाव्या मुंबई मॅरेथॉनसाठी किंग हायले हा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. हायलेनं आपल्या शानदार करिअरमध्ये दोन ऑलिम्पिक गोल्ड मेडल, चार वर्ल्ड चॅम्पियनशिप्स, चार वर्ल्ड इंडोर वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आणि तब्बल २७ वर्ल्ड रेकॉर्ड या महामानवाच्या नावावर आहेत. या सर्व रेकॉर्डवर आपलं नाव कोरलेल्या या किंगला आजही सर्वात अवघड आणि प्रत्येक धावपटूची परीक्षा घेणारी जगात फक्त एकच स्पर्धा वाटते आणि ती म्हणजे मॅरेथॉन... ४२ किलोमीटर धावणं म्हणजे कोणत्याही धावपटूची खरी कसोटी... मॅरेथॉन जिंकणं हे जितकं महत्त्वाचं तेवढंच महत्त्वाचं मॅरेथॉनचं अंतर पूर्ण करणं, असं हायलेला वाटतं.
किंग ‘हायले’ मुंबई मॅरेथॉनमध्ये कधी धावला नाही पण मुंबईकरांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यानं या मॅरेथॉनमध्ये हजेरी लावलीय. सव्वा कोटीपेक्षाही अधिक लोकसंख्या असलेल्या या मायानगरीत फक्त ४० हजार धावपटू धावतात, हे प्रमाण फार कमी असून आपण जास्तीत जास्त लोकांनी धावायला प्रेरित करायला हवं, इतकी लोकसंख्या असलेल्या शहरात वर्षातून फक्त एख मॅरेथॉन न होता २-३ मॅरेथॉन होणं गरजेचं आहे, असं तो म्हणतोय.
धावल्यानं डोक्यातून घाम निघतो आणि या घामाबरोबच डोकं आतून साफ होतं, मेंदू तल्लख होऊन आपण प्रसन्न राहतो. त्यामुळे जसं रोज आपण जेवतो तसचं रोज धावणंही चांगल्या शरिराबरोबच बुद्धीसाठीही फायद्याचं ठरतं, असंही हायले सांगतो. हायले सध्या जरी आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यस्त असला तरी आपण पुन्हा एकदा नक्कीच स्पर्धेतून धावू अशी खात्री देतो.