गगनच्या अकादमीला नोटीस; `झी २४ तास`नं विचारला जाब

भारताला ऑलिम्पिक मेडलची कमाई करून देणारा नेमबाज गगन नारंग याच्यावर पुण्यातील बालेवाडी इथल्या अकादमीवर गदा येण्याची शक्यता ‘झी २४ तास’नं पहिल्यांदा मांडली आणि याच प्रश्नावर क्रीडामंत्र्यांना जाबही विचारला. यावेळी क्रीडामंत्र्यांनी तात्काळ ही नोटीस मागे घेण्यात येईल, असं आश्वासन दिलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 1, 2013, 05:04 PM IST

www.24taas.com, पुणे
भारताला ऑलिम्पिक मेडलची कमाई करून देणारा नेमबाज गगन नारंग याच्यावर पुण्यातील बालेवाडी इथल्या अकादमीवर गदा येण्याची शक्यता ‘झी २४ तास’नं पहिल्यांदा मांडली आणि याच प्रश्नावर क्रीडामंत्र्यांना जाबही विचारला. यावेळी क्रीडामंत्र्यांनी तात्काळ ही नोटीस मागे घेण्यात येईल, असं आश्वासन दिलंय.
बालेवाडी परिसरातील गगन नारंगनं सुरू केलेली स्पोर्टस् अकादमी बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र सरकारकडून पाठवण्यात आली होती. गगन नारंगचा अकादमीबाबत राज्य सरकारशी कोणत्याही प्रकारचा करार झालेला नाही. यामुळेच त्याला ही नोटीस बजावण्यात आल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं होतं. नवे ऑलिम्पियन घडवण्यासाठीच गगननं पुण्यातील बालेवाडी इथं `गन फॉर ग्लोरी` नावानं नेमबाजीच्या अकादमीची स्थापना केलीय. गगनने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला १० मीटर एअर रायफल या नेमाबाजीच्या प्रकारात ब्राँझ मेडलची कमाई करून दिलीय.

क्रीडामंत्र्यांचं आश्वासन
याबाबत ‘झी २४ तास’नं सर्वप्रथम वृत्त दिलं आणि याचा जाबही क्रीडा मंत्र्यांना विचारला. यावेळी, हा निर्णय प्रशासकीय स्तरावर झाला असून आपल्याला त्याचा पत्ता नसल्याचं स्पष्टीकरण क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी दिलं. ‘गगन नारंगची अकादमी बंद करण्यासाठी नोटीस दिली गेली असेल तर ती तात्काळ मागे घेण्यात येईल, असं आश्वासन क्रीडामंत्र्यांनी दिलंय. मात्र, या प्रकारामुळे प्रशासकीय अधिकारी आणि सरकारमध्ये ताळमेळ नसल्याच उघडं झालंय.