नाशकात सत्तेसाठी अपक्षांना भाव

नाशिक महापालिकेच्या निकालानंतर आता सगळ्याच पक्षांच्या गणितज्ज्ञांनी आकडेमोड करायला सुरुवात केलीय. या सर्वांच्या केंद्रस्थानी अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत. अपक्षांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करणं शक्यच नसल्यामुळं अपक्षांचा भाव भलताच वाढलाय.तर नाशिकमध्ये सत्तास्थापनेचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिलेत.

Updated: Feb 22, 2012, 10:32 AM IST

 www.24taas.com,  नाशिक

 

नाशिक महापालिकेच्या निकालानंतर आता सगळ्याच पक्षांच्या गणितज्ज्ञांनी आकडेमोड करायला सुरुवात केलीय. या सर्वांच्या केंद्रस्थानी अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत. अपक्षांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करणं शक्यच नसल्यामुळं अपक्षांचा भाव भलताच वाढलाय.

 

 

महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी त्रिशंकू कौल दिला. त्यामुळं सत्तास्थापनेचं त्रांगडं निर्माण झालंय आणि सगळ्या पक्षांच्या थिंकटॅंकची आकडेमोड येऊन थांबलीय अपक्षांवर. नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर आहे ६२. पक्षीय बलाबल पाहता, मनसे आणि भाजपची युती झाली, तरी संख्याबळ होतंय ५४.  आणि राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना अशी अजब युती झाली, तरी संख्याबळ होतंय ५४. त्यामुळं आपणच तारणहार असल्याची खात्री पटलेल्या अपक्षांनी वेगळा गट स्थापण्याच्या हालचाली सुरू केल्यात. अपक्षांचा महापौर करण्याच्या मागणीनंही जोर धरलाय.

 

 

सत्तेच्या सारीपाटात अपक्षांसह छोट्या पक्षांचं मिळून संख्याबळ आहे १४. महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांच्या विचार मोठ्या राजकीय पक्षांना करावाच लागणार आहे. मात्र या साठमारीत विकासाकडं दुर्लक्ष होईल, अशी भीती राजकीय विश्लेषकांना वाटतेय. महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यात जो कलगीतुरा रंगला होता, त्याचा क्लायमॅक्स आता आलाय. त्यामुळं नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात अपक्षांची पळवापळवी आणि घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे.

 

छगन भुजबळ यांची जुळवाजुळव

 

नाशिकमध्ये सत्तास्थापनेचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिलेत. मनसेच्या ४० जागा आल्याने इतरांना संधी नाही असं नाही असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे इतरांची मदत घेऊन सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु असल्याचे त्यांनी सांगितलंय. शिवाय काँग्रेसमुळेच आघाडीच्या जागा घटल्याचे सांगत पराभवाचे खापर भुजबळांनी काँग्रेसवर फोडलंय. काही दिवसांपूर्वी मनसेचा पहिला महापौर नाशिकचाच होणार असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनेसुद्धा सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्याचे भुजबळांनी सांगितलंय.

 

पाहा व्हिडिओ

[jwplayer mediaid="52572"]