राज आले, पण आम्ही नाही पाहिले...

पुण्यातल्या रस्त्यांवर आज राज ठाकरे रोड शो करणार म्हणून पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पण राज आले कधी आणि गेले कधी, हेच मतदारांना कळलं नाही. पुणेकरांना राज दिसले ते फक्त आलिशान गाडीच्या काचेच्या मागेच. राज ठाकरेंच्या रोड शो साठी पुणं सज्ज झालं होतं.

Updated: Feb 8, 2012, 09:39 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यातल्या रस्त्यांवर आज राज ठाकरे रोड शो करणार म्हणून पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पण राज आले कधी आणि गेले कधी, हेच मतदारांना कळलं नाही. पुणेकरांना राज दिसले ते फक्त आलिशान गाडीच्या काचेच्या मागेच. राज ठाकरेंच्या रोड शो साठी पुणं सज्ज झालं होतं. मनसेचे छोटे समर्थकही यामध्ये हिरीरीनं सहभागी झाले होते.

 

साडे नऊला राज य़ेणार म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली. प्रत्यक्षात राज आले अकरा वाजता. पुण्यातल्या प्रचाराचा नारळ फोडला तो  पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीसमोर. गणपतीची यथासांग आरती आणि दर्शन घेऊन राज ठाकरेंचा रोड शो सुरू झाला. पण गणपतीच्या दर्शनानंतर राज जे गाडीत बसले, ते क्वचितच पुण्याच्या रस्त्यांवर उतरले.

 

या रोड शो दरम्यान राज ठाकरेंचं गाडीबाहेर दर्शन क्वचितच झालं. ओपन जीपमध्ये मतदारांना हात दाखवत उभ्या होत्या त्यांच्या पत्नी. थोड्या थोडक्या मतदारांना दिसले ते आलिशान गाडीत काचेच्या मागे असलेले राज. त्यामुळे मतदारांच्या संपर्कासाठीचा हा रोड शो, नुसताच शो ठरला, असंच म्हणायची वेळ पुणेकरांवर आली आहे.

 

[jwplayer mediaid="44359"]