www.24taas.com, झी मीडिया, पुणे
टेरी मॅक्ल्युहान या अमेरीकन दिग्दर्शिकेची ‘फ्रंटीयर गांधी’ नावाची डॉक्युमेंटरी तयार केलीय. या फिल्मचं स्क्रिनिंग नुकतंच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये करण्यात आलं. खान अब्दुल गफार खान यांच्या आयुष्यावर आधारीत या डॉक्युमेंटरीचं वितरण आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
भारतीय उपखंडात शांतता नांदावी तसंच धार्मिक एकजुटता नांदावी यासाठी आयुष्य वेचणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांच्या जीवनावर आधारीत डॉक्युमेंटरी तयार करण्यात आलीय. अमेरीकन दिग्दर्शिका टेरी मॅक्लुहान यांनी या सिनेमाची निर्मिती केलीय. टेरी यांनी या सिनेमासाठी पाकिस्तानसह अफगाणिस्तानात वास्तव्य केलंय.
गांधींचे समवयस्क असणाऱ्या सरहद्द गांधी यांनी शांततावादी स्वयंसेवकांची एक लाखांची फौज तयार केली होती. या संघटनेला खुदाई खिदमतगार म्हटलं जात असे. मॅक्युहान अशा स्वयंसेवकांनाही भेटल्या. त्यांचे अनुभव ऐकले आणि ही फिल्म तयार केली. ही फिल्म प्रत्येकाने आवर्जून पाहावी असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
खान अब्दुल गफार खान यांच्या आयुष्याची फारशी माहिती भारतात सर्व-सामान्यांना नाही. मात्र, त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या विचारातून समाजाला एक नवी दिशा मिळू शकते. त्यासाठी या फिल्मचं वितरण भारतासह जगात होणं आवश्यक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.