www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
एकेदिवशी चुकून तिचा "मिस्ड कॉल` त्याच्या मोबाईलवर गेला... तिने त्याची माफी मागितली. पण त्याने तिच्या मोबाईलवर नेहमीच फोन करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवसांनी फेसबुकवर बदनामी करण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणात फरारी असलेल्या पुण्याच्या "त्या` तरुणास सोलापूर पोलिसांनी आज अटक केली.
विवेक प्रभाकर कांबळे (वय 22, रा. पिंपरी, जि. पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सोलापुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचा सात-आठ महिन्यांपूर्वी चुकून विवेकच्या मोबाईलवर "मिस्ड कॉल` गेला.
चूक लक्षात आल्यानंतर तिने त्याची माफी मागितली. पुण्यातील मोबाईल शोरूममध्ये काम करणाऱ्या विवेकने तिच्या मोबाईलवर नेहमी फोन करून प्रेमात ओढले. मी तुझ्याच जातीचा आहे... आपण दोघे लग्न करू... असे म्हणून गंडविले. तिला लातूरला फिरायला नेले. फेसबुकवर बदनामीची भीती दाखवून त्याने तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने 15 जुलै 2013 रोजी सोलापुरातील सलगरवस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विवेकविरोधात अत्याचार, अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून सोलापूर पोलिसांनी आरोपी विवेकच्या शोधात पुण्याला फेऱ्या मारल्या, पण तो सापडत नव्हता.
शेवटी मोबाईल ट्रेसिंगवरून पोलिसांनी त्याला शोधून काढले. अटक करून विवेकला बुधवारी न्यायालयात हजर केले. त्याची 16 पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.