अजितदादांचा झंझावाती दौरा

अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये झंझावाती दौरा करून अनेक विकासकामांचा आढावा घेतला.. तर काही कामांचं उद्घाटन केलं. वरकरणी हा अजित पवारांचा हा दौरा नियोजित वाटत असला तरी शहरात गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी असल्याचं स्पष्ट झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 4, 2012, 06:47 PM IST

www.24taas.com, पुणे
अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये झंझावाती दौरा करून अनेक विकासकामांचा आढावा घेतला.. तर काही कामांच उद्घाटन केलं. वरकरणी हा अजित पवारांचा हा दौरा नियोजित वाटत असला तरी शहरात गेले काही दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी असल्याचं स्पष्ट झालंय.
अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड याचं वेगळं नातं... अजितदादांचा वचक असा की पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा एकछत्री अंमल. दादांच्या सोबतीला असणा-या आमदार विलास लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आझम पानसरे, योगेश बेहल, जगदीश शेट्टी तगड्या नेत्यांच्या फौजेमुळं पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा वेगळाच दरारा निर्माण झाला. मात्र अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शहराला वालीच उरला नसल्याचं चित्र निर्माण झालंय.. पक्षाचे तीन आमदार विरुद्ध दिशेला, शहराध्यक्ष योगेश बेहाल यांची स्वतंत्र वाट, आझम पानसरे यांचा वेगळा मार्ग यामुळं पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झालाय. हिच बाब लक्षात घेऊन अजित पवारांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने दौरा करुन स्थानिक नेत्यांमधली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केलाय. एवढंच नाही तर काही चुकत असल्यास सांगा असं आवाहनही त्यांनी केलं..
पक्षात सारं काही आलबेल असल्याचा दावा स्थानिक नेते करतायत. मात्र दादांच्या दौऱ्यामुळं फायदा होईल हे सांगायला विसरत नाहीत. लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या 3 जागांमुळं पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीसाठी महत्वाचं आहे.. मात्र याच बालेकिल्ल्यात बुरुज ढासळले तर गड जिंकण्याचं स्वप्न पाहणा-या अजितदादांना धक्का बसणार आहे.. त्यामुळंच धडक दौऱ्यामार्फत दादांनी शहरावर आपलाच वचक दाखवण्याचा संदेशच स्थानिक नेत्यांना दिलाय.