अजित पवारांची डोकेदुखी वाढवण्याची काँग्रेसची खेळी

इंदापुरमधल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवार संकटात सापडलेले असताना नेमकी हीच संधी साधत काँग्रेसने पिंपरी चिंचवडमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पक्षाची सूत्र जावीत यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 16, 2013, 06:35 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
इंदापुरमधल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवार संकटात सापडलेले असताना नेमकी हीच संधी साधत काँग्रेसने पिंपरी चिंचवडमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पक्षाची सूत्र जावीत यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विखे पाटील आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकत वाढवण्याचा आणि पर्यायाने अजित पवारांची डोकेदुखी वाढवण्याची खेळी काँग्रेस खेळत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस पक्षात राजकीय हालचालींना वेग आलाय. पिंपरी-चिंचवडची सूत्रं हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहेत. पण त्यांच्यावर असलेल्या इतर जबाबदा-या लक्षात घेता शहराचं नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटलांकडे द्यावं अशी मागणी आता जोर धरू लागलीय. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकहाती अंमल आहे. दादांच्या राजकीय खेळीने काँग्रेसचा शहरात पुरता धुव्वा उडालाय. पण आता अजित पवार हेच अडचणीत आल्याने त्यांचेच कट्टर विरोधक असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांकडे शहराची जबाबदारी देण्याची मागणी जोर धरु लागलीय...

अधिवेशन संपल्यानंतर आणखी काही मोठे निर्णय घेतले जाणार असल्याचंही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. राधाकृष्ण विखे-पाटील आणि अजित पवारांचं राजकीय वैर सर्वश्रूत आहे..त्यामुळे त्यांनी जर सूत्र हाती घ्यायचं ठरवलं तर पिंपरी चिंचवडमधलं राजकीय चित्र नक्कीच रंजक होणार यात शंका नाही.