www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
स्वतःला गांधीवादी म्हणवणाऱ्या अण्णा हजारेंच्या अनुयायांनी हिंसेचा मार्ग अवलंबल्याचं समोर आलंय. अण्णांचे माजी स्वीय सहाय्यक सुरेश पठारे, राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंह मापारी यांनी संस्थेच्या वादातून एका महिलेला जबर मारहाण केल्याची घटना घडलीय.
अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात हंगा या गावात ही घटना घडलीय. इथं ‘साईसम्राट एज्युकेशन असोसिएशन’ संस्थेची ‘कौसाई इंटरनॅशनल अकॅडमी’ ही शाळा आहे. अंतर्गत वादातून संस्थेच्या अध्यक्षा कल्पना पठारे यांनी १७ ऑक्टोबरला उपाध्यक्षा दिपाली गिरे यांना कामावरून निलंबित केलं. मात्र, धर्मादाय आयुक्त देतील तोच निर्णय मान्य करू, अशी भूमिका गिरे यांनी घेतली. यावरून कल्पना पठारे आणि गिरे यांच्या वाद झाला.
यातूनच कल्पना पठारे यांच्याबरोबर आलेले सुरेश पठारे, मापारी, शिवसेना तालुकाध्यक्ष निलेश लंके यांच्यासह १४-१५ जणांच्या जमावानं गिरे यांना काठी, लोखंडी गज आणि अन्य हत्यारांनी अमानुष मारहाण केली. पती अश्विन गिरे आणि आई-वडीलांनाही मारहाण झाल्याचा आरोप गिरे यांनी केलाय. यांना मारहाण केल्याचा आरोप दिपाली गिरे यांनी केलाय. केवळ मारहाण करून पठारे आणि मापारी थांबले नाहीत, तर त्यांनी गिरे दाम्पत्याला थेट अहमदनगरला आणून सोडलं आणि ‘…पुन्हा आलात तर जिवे मारू’ अशी धमकी दिल्याचा आरोप गिरेंनी केलाय.
दिपाली गिरे यांच्या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी कल्पना पठारे, निलेश लंके, सुरेश पठारे, जयसिंग मारारी यांच्यासह १५ जणांविरोधात स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
व्हिडिओ पाहा -
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.