www.24taas.com, बीड
शुक्रवारी रात्री बीडमध्ये झालेला रेडिओ बॉम्बस्फोट चांगलाच शक्तीशाली होती असंच चित्र दिसतंय. बसमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा तर हा कट नव्हता ना? असा संशय तपास यंत्रणांना आहे. आणि त्याच दिशेनं सध्या तपास पुढे सरकायला सुरुवात झालीय.
आज दुपारी फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येणार आहे त्यानंतर यात कुठली स्फोटके होती हे स्पष्ट होणार आहे. संदर्भातही आता एटीएस आणि तपासयंत्रणा शोध घेत आहे.
शुक्रवारी ओम निंबाळकर या एसटी वाहकाच्या घरी हा स्फोट झालाय. कुर्ल्याहून सुटलेल्या बसमध्ये हा रेडिओ ठेवण्यात आला होता. या बसचे कंडक्टर ओम निंबाळकर यांनी हा रेडिओ घरी नेला. निंबाळकरांच्या घरातच या रेडिओचा स्फोट झाला. कुर्ला नेहरूनगरला हा रेडिओचा बॉक्स वाहकाच्या हातात अनोळखी व्यक्तीने आणून दिल्याची माहिती मिळतेय. त्यावेळेस वाहकाला हा बॉक्स इंदापूरला कुणीतरी घ्यायला येईल, असं सांगून दोनशे रुपये देण्यात आले होते. बॉक्सवर कुणाचेही नाव नंबर नव्हते. विशेष म्हणजे बस इंदापूरला आल्यावरही तो बॉक्स घेण्यासाठी कुणी आले नाही, बस त्याठिकाणी तब्बल २० मिनिटे थांबली.. त्य़ानंतर, मात्र कुणी न आल्याने बस पुढच्या प्रवासाला लागली.
कंडक्टर ओम रमेश निंबाळकरसह, त्याची पत्नी उषा, आई कुसूम आणि मुलगा कुणाल हेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. रमेशच्या हाताला आणि डोळ्यांना गंभीर इजा झालीय. त्याला मुंबईच्या जेजे हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय. या स्फोटाची क्षमता कमी होती, पण तरीही त्याचं स्वरुप पाहता, हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं समजतंय. त्यामुळे हा स्फोट बसमध्येच घडवून आणण्याचा कट असावा, असा संशय तपास यंत्रणांना आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे.