www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील काही घडामोडींचा संक्षिप्त वेध...
अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले
- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा खात्याच्या चार अधिका-यांना पोमेंडी ग्रामपंचायतीत कोंडण्यात आलंय... पाच हजार लोकवस्तीच्या ग्रामपंचायतीला पाणी योजना मंजूर होऊनही दोन वर्षांपासून ती कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळंच आढावा बैठक घेण्यासाठी आलेल्या या अधिका-यांना कोंडून ठेवण्यात आलंय.. ठोस आश्वासन दिल्याशिवाय कोणालाही सोडणार नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय.
चिमुरड्याला चिरडलं
- बदलापूरमध्ये पाण्याच्या टँकरनं एका ३ वर्षांच्या चिमुरड्याला चिरडलंय. सुभाष नगर भागात ही घटना घडलीय. रोहन राठोड असं या मुलाचं नाव आहे... या दुर्घटनेनंतर संतप्त जमावानं टँकरची तोडफोड करून त्याला आग लावली. तसंच टँकर चालकाला मारहाणही केली.
काश्मीर ते कन्याकुमारी पायी
-डोंबिवलीत राहणा-या ६२ वर्षीय विद्याधर भुस्कुटे यांच्या सामाजिक संदेशासाठी सुरु केलेल्या यात्रेला समाजाच्या सर्वच स्तरातून पाठिंबा मिळू लागलाय.. भुस्कुटे यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पायी प्रवास सुरु केल्याची बातमी झी मीडियावर झळकल्यानंतर त्यांना कल्याण डोंबिवलीतल्या सामाजिक संस्था आणि नेते पुढे सरसावलेत.
या सगळ्यांनी भुस्कुटे यांचा सत्कार करत त्यांच्या पुढच्या प्रवासाठी शुभेच्छा दिल्यात.. तसंच ही बातमी प्रसारीत केल्याबद्दल सामाजिक संस्था आणि नेत्यांनी झी मीडियाचे आभार मानलेत.. डोंबिवलीचे मनसेचे आमदार रमेश पाटील यांनीही आभार व्यक्त करत स्वतःही शक्य झाल्यास भुस्कुटे यांच्या प्रवासात सहभागी होण्याचा मानस व्यक्त केलाय...
अडीच कोटी केटामाइनचा साठा जप्त
- जळगावात पुन्हा केटामाइनचा अडीच कोटींचा साठा डीआरएच्या अधिका-यांनी हस्तगत केलाय. गेल्या पंधरवड्यातील ही दुसरी कारवाई असून याप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आलीय. याआधी जळगाव औरंगाबाद रस्त्यावर उमाळा शिवारात नितीन चिंचोले यांच्या कंपनीत केटामाइनचा ११७५ किलोग्रमचा ११८ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता.
त्यानंतर चिंचोले याच्या घेतलेल्या घर झडतीत १२ लाख रुपये रोकड, ३६२ ग्रम सोने बँकेच्या लॉकर मध्ये सापडले तसच गोदामात पुन्हा ३० किलो केटामाइनचा साठाही जप्त केला.. त्यामुळं सलग दुसऱ्या कारवाईनंतर जळगाव अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणारे मोठे केंद्र बनल्याच उघड झालय.
अभाविपचा गोंधळ
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाकडून पुनर्मुल्यांकनासाठी विद्यार्थ्यांकडून जास्त पैसे आकारले जात असल्याचा आरोप अभाविपनं केलाय...
महिलांची मारहाण
-पिंपरी चिंचवडमध्ये बलात्कार करणा-याच्या आई वडिलांना दामिनी ब्रिगेडच्या महिलांनी मारहाण केलीय. काही दिवसांपूर्वी एका सात वर्षांच्या मुलीवर बालाजी कांबळे या नराधमानं बलात्कार केला होता. पीडित मुलीचे आई वडील हा प्रकार बालाजी कांबळेच्या आई-वडिलांना सांगायला गेले. त्यावेळी या नराधमाच्या आई वडिलांनीच पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मारहाण केली. हा प्रकार कळल्यानंत दामिनी ब्रिगेडच्या महिलांनी त्या नराधमाच्या आई वडिलांना मारहाण केलीय.
बिबट्याचे कातडे विकणाऱ्यांना अटक
-बिबट्याचे कातडे विकण्यासाठी आलेल्या चौघांना पनवेल वनविभागाने अटक केलीय.. हे चौघेजण दांडफाटा इथे कातडे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.. त्यानुसार सापळा रचून बिबट्याच्या कातड्यासह चौघांना अटक करण्यात आलीय. माथेरानवरुन आलेले हे आरोपी दोन लाखात हे कातडे विकत होते..
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.