पुण्यात मुलं चोरणारी टोळी कार्यरत

पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झालीय. शिवाजीनगर एसटी स्टँडवरुन अबीर जोशी या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला पळवण्यात आलं. सुदैवानं दुस-याच दिवशी अबीर सापडला. पण या निमित्तानं पुण्यात मुलं पळवणारी टोळी असल्याचं उघड झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 11, 2012, 10:14 PM IST

www.24taas.com, पुणे
पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झालीय. शिवाजीनगर एसटी स्टँडवरुन अबीर जोशी या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला पळवण्यात आलं. सुदैवानं दुस-याच दिवशी अबीर सापडला. पण या निमित्तानं पुण्यात मुलं पळवणारी टोळी असल्याचं उघड झालंय.
औरंगाबादमध्ये राहणा-या स्मिता जोशी त्यांच्या भावाकडे पुण्याला आल्या होत्या. सोमवारी त्या औरंगाबादला परत जायला निघाल्या. त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा अबिरला घेऊन त्या शिवाजीनगर एस टी स्टँन्डवर आल्या. बसमध्ये चढत असताना स्मिता यांनी त्यांच्याकडच्या पिशव्या बसच्या पायरीवर ठेवल्या. मुलाला घेण्यासाठी मागे वळल्या, तर क्षणार्धात अबीर गायब झाला होता.
या घटनेनंतर अबिरची शोधाशोध सुरू झाली. अखेर शिवाजी नगर परिसरातच अबीर सापडला. त्याला एक अनोळखी महिला घेऊन चालली होती. त्या महिलेनं चेह-यावर कापड गुंडाळलेलं होतं. आणि मुलाचे कपडे बदलले होते. मात्र मुलाच्या काकानं त्याला ओळखलं. ती महिला अबीरला पळवण्याच्या प्रयत्नात होती. या महिलेला पोलिसांनी अटक केलीय. अडीच वर्षांचा अबीर सापडल्यामुळे त्याच्या आईच्या जीवात जीव आलाय.
सुदैवानं अबीर सापडलाय. पण या घटनेमुळे पुण्यात मुलं पळवण्याची टोळी असल्याचं समोर आलंय. पुण्याच्या पोलिसांसमोर या टोळीचा पर्दाफाश करण्याचं आव्हान आहेच. तसंच प्रत्येक पुणेकरानंही सतर्क राहणं गरजेचं आहे.