www.24taas.com, पुणे
थर्टी फर्स्टच्या स्वागतासाठी सारेच सज्ज झालेत.. या दिवशी रंगणा-या पार्ट्यांचे सा-यांना वेध लागलेत. त्यातच पुण्यात थर्टी फर्स्ट पार्टीसाठी 1 वाजेपर्यंत पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलीय. मात्र पुण्यातल्या पालकांना मात्र सावध राहावं लागणार आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्टीआधी पुण्यात गाजली ती चिल्लर पार्टी.. आठवी आणि नववीतल्या विद्यार्थ्यांनी मद्याच्या तालावर होऊन धरलेला बेधुंद ताल पुणेकरांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या पालकांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण सध्या पुण्यातल्या इंग्रजी वृत्तपत्रात थर्टी फर्स्ट पार्ट्यांच्या जाहिराती झळकत आहेत. या जाहिरातीमध्ये कॉकटेल,मॉक्टेल, स्पिरीट असे मद्याचे विविध प्रकार अनलिमिटेड उपलब्ध असतील अशी ऑफर देण्यात आलीय. त्याच बरोबर १२ वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश असेल अशीही ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळं पालकांनी सावध राहण्याची गरज आहे. अशा जाहिरातींवर आता आक्षेप घेण्यात येतोय..
या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा करमणूक कर विभागानंही कंबर कसलीय...पार्ट्यांवर लक्ष ठेवण्य़ासाठी १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आलीय...शिवाय आतापर्यंत १२५ हॉटेलांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून हॉटेलमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आलंय.
पार्टीत होणा-या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिस आणि प्रशासन खबरदारी घेतायत. त्यामुळं थर्टी फर्स्टची रात्री पोलिसांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे.