www.24taas.com, सोलापूर
पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपीला सोडून देण्यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोलापूर पोलिसांवर दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बुथ कॅप्चरींग करणारा हा आरोपी एका माजी आमदाराचा मुलगा आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडला होता.
जेलरोड परिसरात राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. याला तिथल्या बंदोबस्तावरील पोलिसाने विरोध केला. याचा राग आल्यानं कार्यकर्त्यानं पोलिसालाच मारहाण केली. या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली. मात्र तो कार्यकर्ता लक्ष्मणराव ढोबळेंचा जवळचा होता.
ढोबळेंनी य़ा कार्यकर्त्याला सोडून देण्यासाठी कार्यकर्त्यांवर दबाव आणला. जेलरोड पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत तशी नोंदही करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री पोलिसांचे मनोबल वाढवण्याच्या गप्पा मारत आहेत. मात्र त्यांचे सहकारी मंत्री पोलिसांचे खच्चीकरण करण्यात आघाडीवर आहेत. एवढं सगळं घडल्यावर पोलिसांचं कसं मनोबल वाढणार असा सवाल उपस्थित झालाय.