३०० जणांचा धिंगाणा, मनसेकडून तोडफोड

पुण्यातल्या वाघोलीत एका हायप्रोफाईल दारु पार्टीचा पर्दाफाश झालाय. रात्रभर धिंगाणा घालणा-या ३०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं. ज्या ठिकाणी पार्टी झाली तो माया क्लब पुणे एटीएसमधील एका अधिका-याच्या पत्नीच्या मालकीचा आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 2, 2012, 08:13 PM IST

www.24ttas.com,पुणे
पुण्यात वाघोली मधल्या माया क्लब झालेल्या दारू पार्टीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन जोरदार आंदोलन केलं. या वेळी कार्यकर्त्यांनी हॉटेल बाहेरच्या बोर्डचीही तोडफोड केली. तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांनी पार्टीत सहभागी झालेल्या काही मुलांना मारहाणही केली. परिसरातील पब बंद करावेत अशी मागणी मनसेन केलीय.
पुण्यातल्या वाघोलीत एका हायप्रोफाईल दारु पार्टीचा पर्दाफाश झालाय. रात्रभर धिंगाणा घालणा-या ३०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं. ज्या ठिकाणी पार्टी झाली तो माया क्लब पुणे एटीएसमधील एका अधिका-याच्या पत्नीच्या मालकीचा आहे. गेल्या आठवड्यात दोन पार्ट्यांचा पर्दाफाश आल्या असतानाच आता पुन्हा आणखी एका पार्टीचा पर्दाफाश झालाय.
पुण्यातल्या अल्पवयीन मुलांच्या चिल्लर पार्टीचं प्रकरण ताजं असतानाच वाघोलीत पुन्हा तरुण तरुणींच्या हायप्रोफाईल दारु पार्टीचा पर्दाफाश झालाय. वाघोलीच्या माया क्लबवर रात्रभर ही दारु पार्टी रंगली होती. तब्बल ३००तरुण तरुणींनी दारु पिऊन अक्षरक्ष धुडगूस घातला होता. पार्टीत ११२ मुली होत्या. या तरुण तरुणींनी पुण्याच्या संस्कृतीचे अक्षरक्षः धिंडवडे काढले. पुणे ग्रामीण पोलिसांना या पार्टीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या क्लबवर छापा टाकला. पार्टीत सहभागी झालेल्या सगळ्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेत.
बेकायदेशीररीत्या दारू पिणं, धुडगूस घालणे आणि बेकायदेशीर कृत्यात सहभागी झाल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलीय. धक्कादायक बाब म्हणजे पुणे एटीएसमध्ये अधिकारी असलेल्या रजनीश निर्मल या पोलीस अधिका-याची पत्नी अंजली हिच्या नावावर हा क्लब आहे. पोलिसांनी माया क्लबमधून तब्बल दहा लाखांची उंची दारु जप्त केलीये. पोलिसांनी हा दारुसाठा जप्त केला आहे.
तरुण तरुणी आणि पार्टीच्या आयोजकांवर कारवाई होणार असली तरी हॉटेल मालकाला इतरांप्रंमाणं मोकाट सोडणार का असा सवाल उपस्थित झालाय. गेल्या काही दिवसांत तीन दारु पार्ट्यांचा पर्दाफाश झालाय. त्यामुळं सांस्कृतिक राजधानी पुण्याच्या वाटचालीबाबत चिंता व्यक्त करण्यात येतेयं.
दारु पार्टी ज्या माया क्लबमध्ये रंगली त्या क्लबबाहेर एक अलिशान बीएमडब्लू कार सापडली आहे. या कारवर पुणे महापालिका सभासद असा लोगो लावण्यात आलाय. याचाच अर्थ ही कार एखाद्या राजकीय नेत्याची किंवा नगरसेवकाची असावी असा संशय आहे. ही कार घेऊन पार्टीसाठी कोण आलं होतं. खुद्द नगरसेवक किंवा राजकीय नेता आला होता की अन्य कोणी हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अजित पवार यांनी सिंचन घोटाळे करून पैसे कमावले तर, त्यांचे बंधू बेकायदा पार्ट्या करून पैसे कमावत असल्याची खरमरीत टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पुण्यात केली आहे. ज्या ठिकाणी दारू पार्टी झाली तिथल्या जागा मालकावरही गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही तावडेंनी केलीय.