१३ महिन्याच्या मुलीला बापाकडून लाटण्याने मारहाण

मुलींवरचे अत्याचार थांबणार कसे थांबवायचे, हा महत्त्वाचा प्रश्न सध्या देशापुढे असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 2, 2013, 06:40 PM IST

कैलास पुरी, www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
मुलींवरचे अत्याचार थांबणार कसे थांबवायचे, हा महत्त्वाचा प्रश्न सध्या देशापुढे असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. जन्माला आलेली मुलगी आहे. म्हणून अवघ्या तेरा महिन्यांच्या तान्हुलीला जीवे मारण्याचा प्रकार घडलाय. आणि ही मारहाण करणारा नराधम म्हणजे तिचे वडीलच आहेत.
पिंपरीच्या हॉस्पिटलमध्ये ती तान्हुली उपचार घेत आहे. केवळ मुलीचा जन्म म्हणून तिची ही अवस्था झालीय. आणि तिची ही अवस्था करणारा नराधम दुसरा, तिसरा कुणी नसून तिचे वडीलच आहेत. या तान्हुलीला तिच्या वडिलांनी लाटण्यानं मारहाण केली. आरोपी दस्तगीर हुकेरी याला पोलिसांनी अटक केलीय. हुकेरी यानं २००५ साली पाहिलं लग्न केलं. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली झाल्या. त्यामुळे हुकेरीनं २०१० मध्ये दुसरं लग्न केलं. दुस-या पत्नीलाही मुलगी झाली आणि छळाला सुरुवात झाली. १३ महिन्यांच्या तान्हुलीला लाटण्यानं बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये तिला गंभीर दुखापत झालीय. पण तिला उपचारांसाठी डॉक्टरकडेही नेण्यात आलं नाही.
मुलीच्या आईनं या प्रकाराविरोधात तक्रार केलीय. दस्तगीर हुकेरीला अटक करण्यात आली असली तरी सासू सलीमा हुकेरी, नणंद शबाना शेख आणि शिरीन शेख फरार आहेत. दिल्लीत झालेल्या घटनेच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत संतापाची लाट उमटली. तरी या नराधमांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. एक कळी उमलण्याआधीच तिला खुडून टाकण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत.