सांगली जिल्ह्यातील बनेवाडीच्या ग्रामसभेत जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या हाणामारीत तलवारी आणि काठ्यांचा वापर करण्यात आला. या घटनेत चार ग्रामस्थ आणि एक पोलिस जखमी झाला. त्यांच्यावर कवठेमहांकाळच्या ग्रामीण उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आरक्षित जागेत विहिरी बांधण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला ग्रामस्थांचा विरोध आहे. या प्रस्तावाच्या विरोधावरूनच हाणामारीची घटना घडली. कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी येथे राष्ट्रवादी प्रणीत स्थानिक आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते पोपट जगताप यांच्या पत्नी संगीता जगताप ह्या बनेवाडीच्या सरपंच आहेत. सरपंचांनी स्वताच्या जागेतील विहिरीवर अधिग्रहण करायचा ठराव आणला होता. आपल्या वैयक्तिक जागेतील विहीरसाठी सर्व शासकीय योजना लागू करून घेण्याच्या सरपंचांच्या प्रस्तावाला ग्रामस्थांचा विरोध होता.
या बाबत मागील ग्रामसभेत हा ठराव मंजूर करून घेण्यात आला होता. मात्र मागील ग्रामसभा ही बेकायदेशीर असल्याचा आरोप झाल्यामुळे, आज पुन्हा ग्रामसभा बोलावण्यात आली होती. कवठेमहांकाळ पोलिसांनी १० संशयितांना ताब्यात घेतले आहे. सरपंचाच्या गटाने हल्ला केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.