www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
कोपरगाव तालुक्यात कोकमठाण आणि संवत्सर या गावातील गोफणगुंड्याच्या लढाईची प्रथा अखेर बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. मध्ययुगातली ही प्रथा बंद व्हावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. दोन्ही गावातल्या युवकांच्या पुढाकारामुळे या गावाकऱ्यांनी प्रगतशील समाजाच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलंय.
कोपरगाव तालुक्यातल्या गोदावरीच्या नदीकाठवर असलेल्या कोकमठाण आणि संवत्सर या दोन गावात गेल्या अनेक वर्षांपासून ‘गोफणगुंडा’ नावाची प्रथा प्रचलीत होती. पौराणिक कथांचा आधार असलेल्या या पद्धतीनं गोफणीनं एकमेकांना दगड मारले जात. दोन्ही गावात होणाऱ्या या खेळाला युद्धाचं स्वरुप येत असे. ही प्रथा बंद करण्यासाठी ब्रिटीश राजवटीपासून आतापर्यंत खूप प्रयत्न झाले. पण त्याचा उपयोग झाला नाही. उलट या लढाईची आख्यायिका गावोगाव पसरल्याने अनेक ठिकाणहून लोक ही लढाई पहाण्यासाठी येऊ लागले होते. तसंच वैयक्तिक राग काढण्यासाठीही या प्रथेचा वापर अलिकडच्या काळात वाढला होता.
अक्षयतृतीयेपासून पाच दिवस दररोज दुपारी चार वाजता सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत ही लढाई चालत असे. लढाई थांबविण्यासाठी कोणीही एका पक्षाने पांढरे निशाण दाखवावे लागे. युध्द केले नाही तर गावात पाऊस पडत नाही, अशी अंधश्रद्धा समाजात होती. ही मध्ययुगीन प्रथा बंद करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समिती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. यंदा या प्रयत्नांना यश आलंय. दोन्ही गावातल्या नागरिकांनी एकत्र येत ही प्रथा बंद केलीय. मध्ययुगापासून सुरु असलेली ही प्रथा आता बंद झाली असून प्रगतीशल समाजाच्या दिशेनं या गावकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय.
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.