www.24taas.com, झी मीडिया, पुणे
उत्तम आरोग्यासाठी पुण्याची हवा चांगली. पुण्यातलं वातावरण प्रकृतीसाठी चांगलं ही वाक्यं आपण सगळेच गेली कित्येक वर्षं ऐकतोय. पुण्याला हा नावलौकिक मिळाला तो तिथल्या हिरव्यागार टेकड्यांमुळे पण आता हा इतिहास झालाय... पुण्याची फुफुस्सं मानली जाणा-या टेकड्यांवर पुणेकर घाव घालू लागलेत. पुणेकरांनो, वेळीच सावध व्हा, नाही तर विनाश अटळ आहे आणि हे आम्ही नाही तर खुद्द टेकड्याच सांगतायत.
मी पुण्यातली टेकडी... काही दिवसांपूर्वीच माझ्या नावानं बरीच आरडाओरड झाली. कात्रज बोगद्याच्याजवळ म्हणे मी खूप गोंधळ घातला होता. मग हे कसं झालं, का झालं, याच्यावर तुम्ही तावातावानं बोललात. हे सगळं घडावं अशी माझी इच्छा कशी असेल. ते घडलं ते तुम्हा माणसांमुळेच. पैशाच्या आणि जागेच्या हव्यासापायी तुम्ही सर्रास माझ्यावर अत्याचार सुरू केलेत माझा कुठलाही विचार न करता माझ्या अंगावरुन बुलडोझर फिरवू लागलात. हे सगळं सोसणारी मी एकटीच नाही पर्वती, तळजाई, वेताळ टेकडी, हनुमान टेकडी या सगळ्या हाच त्रास मूकपणे सहन करतायत. हे कमी की काय म्हणून वडगाव, कोंढवा, येरवडा, चांदणी चौकातल्या टेकड्यांवरही तुमची वाकडी नजर पडली. आता त्या नव्या विकास आराखड्याच्या नावाखाली तुम्ही माझं पार रुपडं पालटायला निघालायत.
मला न विचारता तुम्ही माझी खरेदी, विक्री करता. मग माझ्या अंगाखांद्यावर खेळणा-या नद्यांचीही मुस्कटदाबी करुन तुम्ही मोकळे होता. सुरूंग लावता, घाव घालता, पोखरुन काढता... काय वाट्टेल ते करता . हे हादरे, हे घाव आता सोसत नाहीत मला सारं काही माझ्या मनाविरुद्ध घडतंय .मी पुरती भुसभुशीत झालेत. मग कधी तरी माझा तोल जातो आणि माझे इतके दिवस दबले गेलेले अश्रू कात्रजच्या पुराच्या रुपानं धोधो वाहतात.
ज्या पुण्यात मी तारुण्यात बहरले, हिरवा चुडा ल्याले, त्याच पुण्यात आज मी शेवटच्या घटका मोजतेय . पुणेकरांनो, माझा अंत पाहु नका. तुमच्या आजी आजोबांना विचारा पानशेतच्या आठवणी. मी संतापले तर पुण्याचा उत्तराखंड होईल ओंकारेश्वराचा केदारनाथ व्हायला वेळ लागणार नाही . मग तेव्हा अखेरचं ओंकारेश्वरी जाण्याचं भाग्यही तुम्हाला लाभणार नाही
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.