मराठ्यांचा इतिहास... दीड पानांत संपला!

‘सीबीएससी’ बोर्डाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये केवळ दीड पानांतच मराठ्यांच्या इतिहासाची माहिती दिल्याचं नुकतंच उघडकीस आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 30, 2013, 07:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
‘सीबीएससी’ बोर्डाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये केवळ दीड पानांतच मराठ्यांच्या इतिहासाची माहिती दिल्याचं नुकतंच उघडकीस आलंय. अनेक इतिहास तज्ज्ञ आणि विचारवंतांनी यावर नाराजी व्यक्त केलीय. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासावर एक प्रकारे अन्याय झाल्याची भावनाही व्यक्त होतेय. याबाबत वैचारिक लढा देण्याचा निर्णय इतिहास संशोधन मंडळाने घेतलाय.
भारताच्या इतिहासाच्या पानांवर एक नजर टाकली तर मराठयांचं नाव अग्रक्रमाने घेतलं गेलं पाहिजे एवढं मोठं योगदान महाराष्ट्राच्या शूरवीरांनी दिलंय. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज ते अटकेपार झेंडे लावणारे पेशवे, तसंच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीची बिजे रोवणारे चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके आणि स्वातंत्र्यवीर सावरकर... पण या महापुरूषांना ‘सीबीएससी’च्या इतिहासाच्या पुस्तकातून वगळण्यात आलंय. ‘सीबीएससी’च्या सातवी ते बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये एकून २१०० पानांचा इतिहास आहे. १७ व्या आणि १८ व्या शतकातील इतिहासासाठी त्यातील तब्बल २५० पाने आहेत. मात्र, मराठ्यांचा इतिहास केवळ दीड पानांतच उरकलाय आणि त्यातही फक्त चार ओळींमध्ये शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करण्यात आलाय. याउलट ज्या नादिरशाहने भारताची लूट केली त्याची मात्र इत्यंभूत माहिती या पुस्तकात दिली गेलीय. ‘एनसीआरटी’च्या या अजब कारभारावर तीव्र आक्षेप घेत महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचा आरोप अनेक इतिहास तज्ज्ञांनी केलाय.
याबाबत वैचारिक लढाई देण्याचा निर्धार पुण्यातील इतिहास संशोधन मंडळाने आणि काही इतिहास तज्ज्ञांनी घेतलाय. मात्र, याबाबत शिक्षण विभाग आणि विशेषतः महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.

आधी केवळ काही राज्यांपुरातच मर्यादित असणारा ‘सीबीएससी’ बोर्डाचा अभ्यासक्रम आता महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्येही सुरु होऊ लागलाय आणि याच अभ्यासक्रमाची आखणी करताना मात्र महाराष्ट्राच्याच इतिहासाला सरळ सरळ बगल देण्यात आलीय. मात्र, याबाबत आता कोण पुढाकार घेणार याकडेच सगळ्या इतिहास प्रेमींच लक्ष लागून आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.