राज ठाकरेंनी प्रस्ताव दिला तर विचार करूः आठवले

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत यावी असं काही जणांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरे आणि माझं मतंही महत्त्वाचं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हंटल आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 3, 2013, 09:24 PM IST

www.24taas.com, पुणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत यावी असं काही जणांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरे आणि माझं मतंही महत्त्वाचं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हंटल आहे. राज ठाकरे यांनी तसा प्रस्ताव दिला तर त्यावर विचार करू अशी पुस्तीही आठवले यांनी जोडली.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी आठवले बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर तरी मनसेने महायुतीत यावे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवावे, अशी अनेकांची इच्छा आहे. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, की अनेकांची इच्छा जरी असली तरी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि माझं मत या बाबत महत्त्वाचं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव दिला तर आपण विचार करून असे आठवले यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी राज ठाकरे आणि रामदास आठवले यांच्या महापालिका निवडणुकांच्या वेळी अनेकादा शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. राज ठाकरेंनी आठवलेंची प्रचार सभेत आणि त्यांच्या पत्रकार परिषदेत नक्कल केली होती. तसेच रामदास आठवले यांनीही अनेकदा राज ठाकरेंवर हल्ला चढवला होता.

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात राज ठाकरे आणि रामदास आठवले हे एकमेकांच्या शेजारी बसले होते. यावेळी त्यांनी काही चर्चाही केली होती. तसेच राज ठाकरे भाजपच्या मुख्यमंत्रीच्या शपथविधीसाठी आल्याने ते महायुतीत येतील असे तर्कवितर्क अनेकांनी लढवले होते. त्यामुळे हाच मुद्दा पुढे करत रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, जर शरद पवार माढ्यातून लोकसभा निवडणूक लढणार नसतील तर मी तिथून निवडणूक लढवीन, असेही रामदास आठवलेंनी म्हटले आहे.