www.24taas.com, कोल्हापूर
गूळ व्यापा-यांच्या मनमानीमुळं शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे भाव जाणिवपूर्वक पाडले जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. गुळाचे भाव 2500 रुपयांपर्यंत कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.
साखर कारखानदारांच्या मनमानीमुळं ऊस उत्पादक शेतकरी अडचणींचा सामना करीत असताना आता व्यापा-यांच्या मनमानीमुळं गुळ उत्पादक शेतकरीही नाडला जातोय. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे भाव अडिच हजार रुपयांपर्यंत कोसळलेत. मुहूर्तावर काढलेल्या गुळाला साडेचार हजारांचा भाव मिळाला असताना व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी गुळाचे भाव पाडत असल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय.
गुळाचे भाव कोसळल्य़ाने संतापलेल्या शेतक-यांनी बाजार समितीत गोंधळ घातला. मात्र व्यापा-यांनी पुन्हा दबाव आणून गुळाचे सौदे सुरु केले. शेतक-यांना परवडत नसेल तर त्यांनी साखर कारखान्यांना ऊस द्यावा अशी अरेरावीची भाषा व्य़ापारी करताय़ेत.
गुळ सौद्यांच्या वादात बाजारसमिती बघ्याची भूमिका घेतय. तर सरकार कोणताही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळं सर्वसामान्य गुळ उत्पादक शेतक-यांची अवस्था घर का ना घाट का अशी झालीये.