www.24taas.com, कोल्हापूर
जयप्रभा स्टुडिओसंदर्भातल्या खटल्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी लता मंगेशकर यांची मालकी असलेल्या जयप्रभा स्टुडिओतील काही जमीन निवासी आणि इतर वापरासाठी खुली करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता.
पण या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना उच्च न्यायालयानं ही मागणी फोटाळून लावत लतादीदींच्या बाजूनं निर्णय दिलाय.
छत्रपती राजाराम महाराजांनी 1934 साली हा स्टुडिओ उभारला होता. त्यानंतर 1944 साली चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी हा स्टुडिओ खरेदी केला.. पुढं या स्टुडिओची मालकी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडं आली. या स्टुडिओमध्ये भालजींच्या काळात नेक भव्य चित्रपटांची निर्मिती झाली.
या स्टुडिओनं अनेक नामवंत कलाकार, तत्रंज्ञ मराठी सिनेसृष्टीला दिले. अनेक कालकार, तंत्रज्ञांना या स्टुडिओशी वैयक्तिक जिव्हाळा होता, इतकचं नाही तर कोल्हापूरकरांसाठी हा अस्मितेचा विषय होता. त्यामुळं हा स्टुडिओ विकण्यास अनेकांचा विरोध होता.