कोल्हापूर: टॅक्स जास्त, विकास कमी

दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणारा आणि सर्वाधिक कर भरणारा कोल्हापूर जिल्हा..पण कोल्हापूर जिल्ह्याची अवस्था कर भरण्यात आघाडीवर आणि विकासात पिछाडीवर अशी आहे. या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारनं वेगवेगळ्या घोषणा केल्या. पण यातल्या अनेक महत्वाच्या घोषणा हवेतच विरलेल्या दिसतायत

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 30, 2012, 09:02 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर
दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणारा आणि सर्वाधिक कर भरणारा कोल्हापूर जिल्हा..पण कोल्हापूर जिल्ह्याची अवस्था कर भरण्यात आघाडीवर आणि विकासात पिछाडीवर अशी आहे. या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारनं वेगवेगळ्या घोषणा केल्या. पण यातल्या अनेक महत्वाच्या घोषणा हवेतच विरलेल्या दिसत आहेत.
राज्य सरकारला सर्वाधिक कर देणारा जिल्हा म्हणून ओळख. पण जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडून म्हणावा तसा निधी मिळत नाही. याउलट राज्यसरकारकडून फक्त अश्वासनांची खैरात केली जाते. कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असणा-या 445 कोटी रुपयांचा थेट पाईपलाईन योजनेला सरकारनं तत्वता मान्यता दिली असली तरी प्रत्यक्षात ही योजना निधीअभावी कार्यान्वितच झालेली नाही. पंचगंगा नदीचीही तीच स्थिती. पंचगंगेचं प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वंकष प्रयत्न करील असं दिलेलं अश्वासनही हवेतच विरलंय. महालक्ष्मी मंदिराच्या शुशोभिकरणासाठी तिर्थक्षेत्र विकास आरखड्यानुसार 120 कोटी रुपये देण्याचंही आश्वासनं पाळावं असं सरकारला वाटलं नाही. कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न तर गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला आहे.
2012 या वर्षात कोल्हापूरकरांसाठी राज्य सरकारनं भरीव असं काहीचं केलेलं दिसत नाही. उलट आयआरबी कंपनीच्या माध्यमातून करवीरकरांच्या मानगुटीवर टोलचं भूत बसवण्याचा डाव सरकार आखत आहे. परंतु सामान्य जनताच टोलविरोधात रस्त्यावर उतरल्यानं नेत्यांचंही त्यापुढं काही चालत नाहीय. त्यामुळ 2012 सालं काहिसं निराशजनक राहिलं असलं तरी 2013 मध्ये तरी सरकारनं आश्वासनं पाळावीत. अशी इच्छा सामान्य करवीरकरांची आहे.