www.24taas.com, पंढरपूर
मनसे शहराध्यधामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलं आहे. पंढरपुरात मनसे शहर अध्यक्षाच्या बनवाबनवीचा फटका बारावीच्या ५० विद्यार्थ्यांना बसला आहे. पांडुरंग भुजंगे यांनी काढलेल्या संजीवनी विद्यालय या नापास विद्यार्थ्यांच्या शाळेचे विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत.
या पन्नास जणांनी १७ नंबरचा फॉर्म भरुन बारावीच्या परीक्षेची तयारी केली होती. मात्र शेवटच्या दिवशीही त्यांच्या हातात हॉलतिकीट पडली नाहीत. त्य़ामुळे वर्षभर अभ्यास केलेल्या या उमेदवारांना बारावीची परीक्षा देता आली नाही. संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनी भुजंगेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शाळेत सील ठोकलं आहे. चौकशीअंती ही शाळा नसून केवळ कोचिंग क्लास असल्याचं समोर आलं आहे.
संस्थाचालक भुजंगे फरार झाला आहे. मुख्य म्हणजे उद्याच सोलापूरात राज ठाकरेंची सभा होतेय आहे. त्याच्या आदल्याच दिवशी जिल्ह्यातल्या एका शहर अध्यक्षाच्या या बनवाबनवीनं या सभेला अपशकून केल्याची चर्चा आहे. मात्र आता राज ठाकरे या शहराध्यक्षांवर काही कारवाई करणार का? याबाबत प्रश्न विचारला जात आहे.