एनडीएमध्ये सामिल व्हा आणि पंतप्रधान बना, पवारांना ऑफर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 12, 2012, 05:29 PM IST

www.24taas.com, पुणे
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय. ‘पवार भाजपशी असलेले सगळे मतभेद विसरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाले तर पंतप्रधानही बनू शकतील’ असं जोशी यांनी म्हटलंय.
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात मनोहर जोशी यांनी शरद पवारांच्या राजनैतिक कुशलतेचं तोंडभरून कौतुक केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलं, ‘पवारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी व्हायला हवं त्यामुळे आपांपसातील भांडण दूर होण्यास मदत होईल आणि सगळे एकत्र येऊ शकतील. पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांच्याच पथ्यावर पडणार आहे. यामुळे त्यांचं पंतप्रधानपदावर बसण्याचं स्वप्नदेखील पूर्ण होऊ शकेल’.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे इतर घटक या प्रस्तावाला स्वीकारतील का या प्रश्नावर उत्तर देताना माजी लोकसभा अध्यक्ष जोशी म्हणतात, ‘जर पवारांनी मनात आणलं तर ते घडवून आणू शकतील’. या आधीही माजी मुख्यमंत्री राहिलेल्या जोशी यांनी शरद पवारांवर स्तुती सुमनं उधळली होती. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या या नेत्याकडे पंतप्रधान बनण्याची पूर्ण क्षमता असल्याचंही त्यांना वाटतंय.