दाभोलकर हत्येनंतर पुण्यात राजकीय पक्षांच्यावतीनं निषेध

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे पडसाद आजही सर्वत्र उमटले. पुण्यामध्ये विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ दाभोलकरांनी उभारलेली चळवळ पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 22, 2013, 11:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे पडसाद आजही सर्वत्र उमटले. पुण्यामध्ये विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ दाभोलकरांनी उभारलेली चळवळ पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ पुणेकर रस्त्यावर उतरले. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते या निषेध मोर्चात सहभागी झाले. महापालिकेतल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली, तर मंडईतल्या टिळक पुतळ्याजवळ जाहीर सभेनं मोर्चाचा समारोप झाला. डॉ दाभोलकरांच्या हत्येबद्दल सरकार आणि प्रतिगामी शक्तींविषयीचा संताप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. म्हणूनच या निषेध सभेत राजकारण्यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉ दाभोलकरांनी उभारलेली चळवळ त्यांच्या पश्चातही अधिक जोमानं पुढे नेण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
दाभोलकरांच्या हत्येचे अजूनही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. संशयित आरोपीचं स्केच जारी करण्याव्यतिरिक्त कुठलीच प्रगती तपासामध्ये झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी जोर धरतेय.
डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतरच्या प्रतिक्रिया यापुढच्या काळातही उमटत राहणार आहेत. मात्र त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत लढलेल्या लढ्याला यश मिळणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.