पुणे पोटनिवडणुकीत काँग्रेस, मनसेत टक्कर

पिंपरी चिंचवड मध्ये आज भोसरी मधल्या प्रभाग क्रमांक ३४ मधल्या पोटनिवडणुकीसाठी केवळ 29 टक्के मतदान झालं. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रद्धा लांडे आणि शिवसेनेच्या सारिका कोतवाल यांच्यात या मतदारसंघात थेट लढत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 7, 2013, 09:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पिंपरी चिंचवड मध्ये आज भोसरी मधल्या प्रभाग क्रमांक ३४ मधल्या पोटनिवडणुकीसाठी केवळ 29 टक्के मतदान झालं. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रद्धा लांडे आणि शिवसेनेच्या सारिका कोतवाल यांच्यात या मतदारसंघात थेट लढत आहे. मात्र यासाठी मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सीमा फुगे यांचं नगरसेवकपद बनावट जातप्रकरणी रद्द झाल्यामुळे पोटनिवडणूक होतेय.
पुणे महापालिकेच्या ४० अ या प्रभागात पोटनिवडणूकीसाठी आज मतदान झालं. मतमोजणी सोमवारी होणार आहे. जातीचे खोटं प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहिरट यांचा नगरसेवक पद रद्द झालं आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक लागलीय.
ही पोटनिवडणूक कमालीची चुरशीची बनलीय. कॉंग्रेस आणि मनसेने तर आपली सर्व प्रतिष्ठा या निवडणुकीसाठी पणाला लावलीय. त्याचं कारण म्हणजे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद... महापालिकेत कॉंग्रेस आणि मनसेचे प्रत्येकी २८ म्हणजे, समसमान संख्या बळ आहे. पोटनिवडणुकीत विजय मिळाला तर, मनसेचा एक नगरसेवक वाढेल आणि महापालिकेतील विरोधीपक्ष नेते पद देखील मनसेकडे येईल. इंदुमती फुलावरे मनसेच्या उमेदवार आहेत. त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीमधून मनसेत प्रवेश केलाय. मनसे प्रमाणेच काँग्रेससाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. कारण दोन महिन्यापूर्वीच मनसेकडील विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसकडे आले आहे. ते टिकवायचे असेल तर, कॉंग्रेसला विजय आवश्यक आहे.
लक्ष्मीताई घोडके काँग्रेसच्या उमेदवार आहेत. कॉंग्रेस आणि मनसे व्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या नीलम लालबिगे आणि भाजपच्या संध्या बरके या देखील रिंगणात आहेत. या दोन्ही पक्षांची भूमिका देखील महत्वाची राहणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.