www.24taas.com, पुणे
कलमाडींचं अधिराज्य असलेल्या पुणे फेस्टिव्हलचं नेते-अभिनेते आणि खेळाडूंच्या उपस्थितीत शानदार उदघाटन झालं खरं. मात्र, छगन भुजबळांची दांडी आणि गोपीनाथ मुंडेंची कलमाडींच्या मांडीला मांडी. यामुळे फेस्टिव्हल रंगला तो बाकीच्याच चर्चेने...
24 व्या पुणे फेस्टिवलचं शानदार उद्घाटन झालं. हेमामालिनी यांच्या गणेशवंदनानं पुणे फेस्टिवलला सुरुवात झाली. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक सतीश आळेकर, नेमबाज विजय कुमार, गगन नारंग आणि एव्हरेस्ट वीर उमेश झिरपे यांचा यावर्षीच्या पुणे फेस्टिवलमध्ये सन्मान करण्यात आला. मात्र, या वेळच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं.. ऑलिम्पिकमध्ये मेडल्स मिळवत सा-या देशाचं नावं उंचावण-या खेळाडूंना नेते, अभिनेते आणि अभिनेत्रीच्या मागे स्थान देण्यात आलं. नेते-अभिनेते पुढच्या खुर्चीवर तर ऑलिम्पिकवीर सुशीलकुमार, विजय कुमार यांसारख्या गुणी खेळाडूंना मागच्या रांगेत बसवण्यात आलं. आणि हीच गोष्ट पुणेकरांसाठी खटकणारी ठरली.
पुणे फेस्टिव्हलमध्ये सुरेश कलमाडी पुन्हा एकदा सक्रीय दिसल्याने काही मराठी कलाकारांबरोबरच बॉलिवूडच्या कलाकारांची मांदिआळी पुन्हा एकदा फेस्टिव्हलमध्ये पहायला मिळाली. अभिनेत्री हेमामालिनीसह नेहा धूपिया, परिणीती चोप्रा फेस्टिव्हलचं आकर्षण ठरल्या.
तर दुसरीकडे कलमाडींच्या मांडीला मांडी लावून बसलेले भाजप नेते गोपीनाथ मुंडे तसंच काँग्रेसचे चार मंत्रीही फेस्टिव्हलला जातीनं हजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र यंदाच्या फेस्टिव्हलपासून चार हात लांब राहणंच पसंद केलं. राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाला उपस्थिती लावणार होते. मात्र, त्यांनीही आयत्यावेळी दांडी मारली. तर महापौरांची अनुपस्थिती हाही चर्चेचा विषय ठरला.