अरेरे... पुणे महापालिकाने बूटही सोडले नाहीत

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे जोडे कुरतडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. होय, यावर्षीच्या बूट खरेदीमध्ये लाखोंचा घोटाळा उघडकीस आला आहे.

Updated: Sep 8, 2012, 07:56 PM IST

www.24taas.com, पुणे
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे जोडे कुरतडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. होय, यावर्षीच्या बूट खरेदीमध्ये लाखोंचा घोटाळा उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी कंत्राटदारांकडून चक्क जोड्यांचीच लाच घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या गठ्ठ्यांमध्ये विद्यार्थ्यांचे बूट आहेत. एक संपूर्ण टेम्पो याठिकाणी खाली करण्यात आलाय. मात्र हा सगळा प्रकार काय आहे हे ऐकल्यावर आपल्याला धक्काच बसेल. महापालिकेच्या शिक्षण मंडळानं केलेल्या बूट खरेदीमधील भ्रष्टाचार उघड करू होऊ नये. यासाठी देण्यात आलेली ही `इन काइंड` स्वरूपातील लाच आहे. मात्र या प्रकरणाची तक्रार आधीच देण्यात आल्यानं खरा घोटाळा उघडकीस आला आहे.
महापालिका शिक्षण मंडळाने ३०० शाळांच्या ८३ हजार ३५० विद्यार्थ्यांसाठी बूट आणि मोजे खरेदी केले. पुरवठादाराने हे बूट केवळ ८० रुपये दराने खरेदी केलेले होते. मात्र शिक्षण मंडळाने ते बूट पुरवठादाराकडून २५२ रुपये दराने खरेदी केले. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या महामंडळामार्फत हा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
या बूट खरेदीत तत्कालीन शिक्षण मंडळ पदाधिका-यांसह अनेकांचे हात ओले झाले असल्याचा आरोप ब-हाटे यांनी केलाय. याबाबतची तक्रार त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. बूट खरेदीपोटी २ कोटी ११ लाख रुपये देण्याची प्रक्रिया शिक्षण मंडळाकडून सुरु आहे. मात्र ही बूट खरेदी बेकायदेशीर असल्याने ही प्रक्रिया थांबवावी अशी मागणी त्यांनी केली.