आबा कळत नसेल तर गृहखातं सोडा - राज

`अजितदादांनी गृहखातं घेऊन टगेगिरी दाखवावी` असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं.

Updated: Aug 23, 2012, 09:07 PM IST

www.24taas.com, पुणे
`अजितदादांनी गृहखातं घेऊन टगेगिरी दाखवावी` असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं.
मुंबईत झालेल्या हिंसाचाराचा निषेधार्थ राज ठाकरे यांनी पोलीस कमिशनर अरूप पटनायक आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली. `पोलीस कमिशनर जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच गृहमंत्री हे देखील आहेत.` असा घणाघाती हल्ला राज ठाकरे यांनी केला.
गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर पुन्हा टीका करताना ते म्हणाले, `यांना जर खातं काय आहे हेच अजून कळत नसेल तर त्यांनी स्वतः राजीनामा देऊन दूर व्हायला हवे होते.` आपल्याला ज्या कामात गती नाही ते करायचेच कशाला, असा टोलाही ठाकरेंनी हाणला.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांच्याशी वैयक्तिक वैर नाही. मात्र, ११ ऑगस्टला त्यांनी ज्या पद्धतीने कारवाई करणे आपेक्षित होते ती त्यांच्याकडून घडली नाही. आरोपींचा शोध घ्यायचा तर ते म्हणतात, रमजान महिना संपल्यानंतर तपास केला जाईल. तोपर्यंत गुन्हेगार तुमची वाट पाहात मुंबईत थांबणार आहेत का ? असा संतप्त सवाल त्यांनी केली.
राज्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करताना, त्यांना तडीपार करताना सण पाहिले जात नाहीत. मग आताच कसे पोलिस खात्याला सण आठवतात असे ही ते म्हणाले.
रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा.सु.गवई या दलित नेत्यांवर राज यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण होती की, शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा यापैकी पहिल्या दोन गोष्टी बहुतेक हे नेते विसरलेले आहेत.