पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार होणार?

पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराच्या किरकोळ दुरस्तीस परवानगी देण्याच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयावर विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी नाराजी व्यक्त केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 16, 2013, 07:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराच्या किरकोळ दुरस्तीस परवानगी देण्याच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयावर विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी नाराजी व्यक्त केलीय. हे मंदिर पाडून नवीन का बांधू नये? असा सवाल त्यांनी विचारलाय. मंदिर पाडण्याच्या त्यांच्या सुचनेवर वारकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. त्यामुळे या प्रकरणावर राज्यात वादळ उठण्याची शक्यता आहे.
पंढरपुरचं विठ्ठल मंदिर म्हणजे वारकरी संप्रदायाचे माहेर घर... हजारो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या मंदिराची सध्या काही भागात पडझड झालीय. त्यामुळे मंदिराच्या किरकोळ दुरस्तीसाठी पुरातत्व विभागानं परवानगी दिलीय. मात्र, या निर्णयाला मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी विरोध केलाय. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची कल्पना बोलून दाखवलीय.

मात्र, अण्णा डांगे यांनी केलेल्या मागणीचा वारकरी संघटनांनी विरोध केलाय. विठ्ठल मंदिर हे पुरातन आहे या मंदिराची सतत देखभाल आवश्यक आहे. मात्र, हे मंदिरचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्याची भाषा वारकऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे या प्रकरणाचे आगामी काळातही मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.