www.24taas.com, झी मीडिया, सांगली
सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं दंगलीतल्या आरोपींचा आधार घेतल्याचं दिसतंय. २००९ मध्ये सांगलीत दंगल भडकावणा-या आरोपींच्या प्रचारसभेस चक्क गृहमंत्र्यांनीच हजेरी लावत लांबलचक भाषणही ठोकलं तर दुसरीकडे मिरजेत दंगलीच्या आरोपीलाच सोबत घेवून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी उमेदवारांच्या जाहीर सभा घेतल्या. त्यामुळं नैतिकतेच्या भाषा शिकवणा-या आणि स्वच्छ चारित्र म्हणून डांगोरा पिटणा-या गृहमंत्र्यांचं आणि राष्ट्रवादीचं खरं रूप दिसून येतंय. असं चित्र पाहून राष्ट्रवादी कुठल्या दिशेनं चाललीय असा प्रश्न सांगलीकरांना पडलाय.
सांगली महापालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी राष्ट्रवादीनं दररोज नेता आणून सांगली-मिरजेत सभा घेतल्या जातायत. राष्ट्रवादीनं दिलेले उमेदवार हे गुन्हेगारी स्वरूपाचे आणि गंभीर गुन्हे दाखल असलेले आहेत असे सातत्याने आरोप केले जात आहेत.यामध्ये राष्ट्रवादीने दंगलीतील आरोपींनाही उमेदवारी देवून टाकल्याने निष्ठावंत आणि प्रामाणिक उमेदवारावर संक्रांत आली आहे.विशेष म्हणजे २००९ साली मिरजेत उसळलेल्या जातीय दंगलीतील आरोपी मैन्नुद्दिन बागवान आणि सांगलीत ज्यांनी हीच दंगल पेटविली असा अज्जू पटेल यांच्यासह तडीपार आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.सर्वात धक्कादायक बाब अशी की सांगलीत दंगल भडकवणाऱ्या राष्ट्रवादीचा उमेदवार अज्जू पटेल यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला चक्क गृहमंत्री आर आर पाटील यांनी उपस्थिती लावीत दंगलीतील आरोपीच्या मांडीला मांडी लावून बसून आपण कित्ती स्वछ चारित्र्याचे आहोत हे समाजाला दाखवून दिले.
तर दुसरीकडे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मिरज दंगलीचा आरोपी मैनुद्दीन बागवान यांच्यासोबतच प्रचार सभांना हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे मैनुद्दीन बागवान यांनाही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी मंत्र्यांच्या या कारनाम्यामुळे आपण किती स्वच्छ प्रतिमेचे आहोत हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा सिध्द केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.