'त्या' क्रुरकर्म्याची फाशी कायम, न्यायालय म्हणतं...

पुण्यात बेदरकारपणे बस चालवून ९ जणांचा बळी घेणा-या संतोष मानेची फाशी सत्र न्यायालयानं कायम ठेवलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 11, 2013, 11:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात बेदरकारपणे बस चालवून ९ जणांचा बळी घेणा-या संतोष मानेची फाशी सत्र न्यायालयानं कायम ठेवलीय.
पुण्यामध्ये बेदरकारपणे बस चालवून मृत्युचं तांडव घडवणाऱ्या बस ड्रायव्हर संतोष मानेची फाशीची शिक्षा पुणे सत्र न्यायालयानं कायम ठेवलीय. ८ एप्रिल २०१३ रोजी पुणे सत्र न्यायालयाने संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात माने उच्च न्यायालयात गेला होता. शिक्षा सुनावताना आरोपीचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं नसल्याचं सांगत उच्च न्यायालयानं पुणे न्यायालयानं दिलेली शिक्षा रद्द ठरवली होती. तसंच या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गेले अडीच महिने या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या या २५ जानेवारी २०१२ च्या या घटनेत जणांचा मृत्यु झाला होता.
आरोपी संतोष मानेची मानसिक स्थिती उत्तम आहे, तो मनोरुग्ण नाही. संतोष मानेने मानसिक आजारी असल्याचं सांगत केलेला बचाव अत्यंत खोटा आहे. माने शिक्षेविषयी मत मांडण्यासाठी सक्षम आहे. मानेनं पश्चातबुद्धीनं न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केला आहे. त्यानं केलेला बचाव हा खोडसाळपणाचा तसेच खोटा आहे. संतोष मानेचं कृत्य अघोरी आहे. सामान्य, गरीब लोकांचा बळी घेणे हाच त्याचा हेतू होता. बस थांबली नसती तर त्याने आणखी अनेकांचे बळी घेतले असते. संतोष मानेची शिक्षा कमी करणं म्हणजे कायद्याची पायमल्ली ठरेल. असं कोर्टानं शिक्षा सुनावताना म्हटलंय. आता या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं संतोष मानेच्या वकिलांनी सांगितलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.