मनपाच्या साडी खरेदीतही घोटाळा!

महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठीच्या साडी खरेदीत गैरव्यवहार झालाय. संबंधित ठेकेदारानं महापालिकेला सुमारे २७ लाखांचा गंडा घातल्याचं लेखापरीक्षण समितीच्या अहवालातून समोर आलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 29, 2013, 06:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसाठीच्या साडी खरेदीत गैरव्यवहार झालाय. संबंधित ठेकेदारानं महापालिकेला सुमारे २७ लाखांचा गंडा घातल्याचं लेखापरीक्षण समितीच्या अहवालातून समोर आलंय. या प्रकरणी संबधित ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्य़ांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना महापालिकेकडून महिलांना साड्या आणि पुरुषांना ड्रेस दिले जातात. गेल्या वर्षी या साड्या पुरवण्याचं काम पुण्यातल्या ‘पुनम ड्रेसेस अँड टेलरिंग फर्म’ या संस्थेला देण्यात आलं होतं. त्यानुसार सुमारे १२ हजार नऊवारी साड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप त्याचवेळी झाला होता. मात्र या साड्या निकृष्ट दर्जाच्या का होत्या, याचा उलगडा आता झालाय.
महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार या साड्यांची खरेदी मालेगावमधल्या कंपनीकडून करण्यात येईल, असं नमूद करण्यात आलं होतं. मात्र या ठेकेदाराने त्याऐवजी पुण्याच्या रविवार पेठेतूनच या साड्या खरेदी केल्या. याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या एका साडीची किंमत ४१० रुपये असताना महापालिकेला ती ४९० रुपयांना विकण्यात आली. त्यामुळे साड्यांच्या एकूण खरेदीवर महापालिकेला सुमारे २७ लाखांचा जास्तीचा भुर्दंड पडला.
महापालिकेच्या स्टोअर विभागामार्फत ही खरेदी झालीय. त्यात महापालिकेचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. याप्रकरणी महापालिका प्रशासनानं संबधित ठेकेदार तसंच काम मंजूर करणा-या अधिका-यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या कामापोटी संबधित ठेकेदाराला आतापर्यंत ४० लाखांचे बिल अदा करण्यात आलं असून त्याचं उर्वरित बिल रोखण्यात आलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.