www.24taas.com, झी मीडिया, चाकण
जन्मजात कमरेखालून अवयव जोडलेली सयामी जुळी बालके हा प्रकार आपल्यासाठी नविन नाही, मात्र चाकण परिसरात चक्क सयामी सर्प आढळून आला आहे. या सर्पांचे अवयव एकमेकांत गुंतलेले असण्याचा प्रकार फार दुर्मिळ असून शेपटीपासून मानेपर्यंतचा भाग एकमेकांना चिटकलेला असून पुढे दोन वेगवेगळी तोंडे एकाच दिशेला आहेत.
हा विचित्र प्रकारचा सर्प पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. फ्रेंड्स ऑफ नेचरच्या सर्प मित्रांनी या विचित्र सयामी जुळ्या सर्पास वाचविण्याचा संकल्प केला आहे.
गर्दीच्या त्रासापासून वाचविण्यासाठी त्याला पुण्यातील कात्रज वन्यप्राणी अनाथालयात हलविण्यात आले आहे. वनविभागाच्या अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
फ्रेंड्स ऑफ नेचरच्या कार्यकर्त्यांना कुरुळी (ता.खेड,जि.पुणे) येथील दादा जैन यांच्या शेतात असा सर्प असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्पमित्र प्रा. बापूसाहेब सोनवणे, श्रीकांत साळुंके, आसिफ सय्यद आदींनी घटनास्थळी जावून पहिले असता असा दोन तोंडाचा सर्प त्यांना आढळून आला.
तपकिरी रंगाचा हा तस्कर जातीचा साप असून त्याची लांबी अकरा इंच आहे. त्याचे शेपटापासूनचे धड एक असून पुढे मान आणि डोकी मात्र दोन आहेत. हा दुर्मिळ साप सर्पमित्रांनी ताब्यात घेतला असून त्याला वाचविण्याचा संकल्प केला आहे.
प्रसुतिशास्त्रतज्ज्ञ व सर्पतज्ज्ञ डॉ. अमित कामत आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयाचे संचालक अनिल खैरे यांनाही त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. डॉ. कामत यांनी त्या सापाच्या एक्स-रे सह विविध तपासण्या केल्या. त्यानंतर त्या सापाला कात्रजच्या वन्यप्राणी अनाथालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ. अमित कामत यांनी या दुर्मिळ सापाविषयी माहिती देताना सांगितले की, एक अंडे आणि एक शुक्राणू यांच्यापासून गर्भ तयार होतो. हा गर्भ वाढण्याच्या अवस्थेत असताना त्याचे क्वचित विभाजन होते.
ज्या अवयवाचे विभाजन होते. ते दोन अवयव तयार होतात. हा प्रकार खूप दुर्मिळ असतो. सापांमध्येही हा प्रकार फार दुर्मिळ आहे. मात्र निसर्गात असे प्राणी दीर्घकाळ जगू शकत नाहीत. या प्राण्यांना हृदय एकच असते आणि त्यावर जास्त अवयवांचा ताण असल्याने हृदयविकाराने त्यांचा अंत होतो. त्यामुळे हा साप दुर्मिळ असला तरी तो निसर्गात फार काळ जगणे कठीण आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.