www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षात पाणी टंचाईला तोंड देत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने मंत्रालयात थेट पाईप लाईन योजना सादर केली गेली. पण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध केलाय. याचा निषेध म्हणुन महापालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंत्रालयातल्या अधिका-यांची अंत्ययात्रा काढली.
शिवाजी चौकात मंत्रालयातले मुख्य सचिव जयंत बांठिया, प्रधान सचिव पाणी पुरवठा विभाग मालिनी शंकर आणि सदस्य सचिव राधेश्याम मोपेलवार या अधिका-यांचा तीव्र शब्दात निषेध केला. हा या आंदोलनाचा पहिला टप्पा असुन जर ही थेट पाईप लाइन योजना मंजूर झाली नाही तर मंत्रालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा देण्यात आलाय.
खरंतर पाणी टंचाई, दुषित पाणी पुरवठा अशा समस्यांपासून सुटका व्हावी या उद्देशाने कोल्हापूरकरांनी काळम्मावाडी धरणातून थेट पाईप लाईनव्दारे पाणी आणण्याची 440 कोटींची योजना तयार केली,पण त्याला विरोध होतोय.