www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
पुण्यामध्ये वैशाली बनकर यांच्याकडून पक्षानं महापौरपदाचा राजीनामा घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही महापौर बदलाचं वारं वाहू लागलंय. अजित पवारांनीच तसं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आता त्यांनी ते पूर्ण करावं, असा सूर उमटू लागलाय.
पिंपरी-चिंचवडचं महापौरपद अडीच वर्षांमध्ये दोघांना देण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला. त्यानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी मोहिनी लांडे यांनी पदाची सूत्रं हातात घेतली. पण सव्वा वर्ष झालं तरी त्यांना बदलण्यासंदर्भात पक्षात कसलीही हालचाल नाही. पण पुण्यामध्ये वैशाली बनकर यांचा राजीनामा घेतला गेल्यामुळे पिंपरी- चिंचवडमध्येही महापौर बदलावा, अशी मागणी आता जोर धरू लागलीय.
यासंदर्भात अजित पवार जो निर्णय घेतील, तो मान्य असल्याचं मोहिनी लांडे यांनी सांगितलंय. नंदा ताकवणे, झामाबाई बारणे, शमीम पठाण या सगळ्या जणी महापौरपदासाठी इच्छुक आहेत. पण मोहिनी लांडे यांचे पती आणि आमदार विलास लांडे हे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांवर डोळे ठेवून आहेत. त्यामुळे त्यांना हे पद घरातच रहावं असं वाटतंय. आता या परिस्थितीत अजित पवार काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यात जास्त इच्छुकांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.