www.24taas.com, झी मीडिया, पुणे
‘...याला मराठी साहित्य संमेलन आहे की कुस्तीचा आखाडा’ अशी टीका राज ठाकरेंनी साहित्य संमेलनाच्या राजकारणावर आणि नेहमीच्याच वादावर केलीय. सोबतच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. ते पुण्यात बोलत होते.
गुरुवारी, पुण्यातल्या टिळक स्मारकात ‘ऐसी अक्षरे’ या मासिकाचा दशकपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी ‘ऐसी अक्षरे’च्या विशेषांकाचं उद्घाटनही राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना त्यांनी मराठीचा कडवट अभिमान असायला हवा, असं म्हटलंय. सोबतच, आत्तापर्यंत रसिकांच्या चांगल्याच परिचयाच्या झालेल्या साहित्य संमेलनाच्या राजकारणावरही त्यांनी टीका केलीय. ‘साहित्य संमेलनाबद्दल बातम्या पाहून वीट येतो...याला मराठी साहित्य संमेलन आहे की कुस्तीचा आखाडा’ अशा शब्दांत त्यांनी साहित्य संमेलनाची फिरकी घेतली. सोबतच, ‘ज्या लेखकाच्या पुस्तकांची विक्री जास्त, त्याला अध्यक्ष करा’ अशी सूचनाही राज ठाकरे यांनी यावेळी केलीय.
हवाय मराठी भाषेचा कडवट अभिमान...
यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या हक्काच्या मराठीच्या मुद्द्यालाही हात घातला. ‘मराठीबद्दल केवळ आंदोलन करून होणार नाही. आंदोलनं, सभांमुळे मराठीचा अभिमान येत नाही तर तो असावा लागतो. आपण आपल्या भाषेबद्दल आपण जागृत असलं पाहिजे... नव्हे मराठीबद्दल आपल्या मनात कडवट अभिमान हवा’ असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.