www.24taas.com, अमरावती
अमरावती येथे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. सिंचनाचं पाणी इंडियाबुल्सला देऊ नका असं सभेपूर्वीच राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. याच भुमिकेला अनसरून राज ठाकरेंनी आपल्या सभेमध्ये सिंचन घोटाळ्याचे पुरावे समोर आणले.
राज ठाकरेंनी सभेच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. त्यांच्याच वक्तव्याचे दाखले देत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले. काँग्रेस हायकमांडचे विश्वासू असूनही राज्यातल्या समस्यांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीकडून मदत का नाही मिळत? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रातील समस्यांची मुख्यमंत्रीच कबुली देत आहेत, मात्र त्यावर उपाय काय करावेत, हेच त्यांना समजत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
आघाडीमुळेच विकासकामांमध्ये अडथळा येत आहे, हे जर खुद्द मुख्यमंत्री कबुल करत आहेत, तर आघाडी करता कशाला, असा सवाल राज ठाकरेंनी केला. हे सरकार निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचं असल्याची सणसणीत टीका राज ठाकरेंनी केली.