www.24taas.com, मुंबई
सचिन तेंडुलकर... भारतीय क्रिकेटचा देव. मास्टर-ब्लास्टर 40 व्या वर्षात पदार्पण करतोय. बॅटिंगचे जवळपास सारेच रेकॉर्ड नावावर असलेला सचिन आजही क्रिकेटच्या मैदानावर तळपतोय. वन-डेला अलविदा केल्यानंतर टेस्टमध्ये सचिनचा जलवा कायम आहे.
क्रिकेटच्या या अनभिषिक्त सम्राटाला `झी २४ तास`कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... भारतीय क्रिकेट म्हणजे सचिन तेंडुलकर... आणि सचिन तेंडुलकर म्हणजेच भारतीय क्रिकेट असं समीकरणच बनलंय. क्रिकेटविश्वातही मास्टर-ब्लास्टरचाच बोलबाला आहे. सर्वाधिक रन्स, सर्वाधिक सेंच्युरीज यासारख्या एक ना अनेक रेकॉर्डसला भारताच्या या रनमशिननं गवसणी घातलीय. सचिननं केवळ क्रिकेटच्या मैदानावर एंट्री घेतली की, एखादा रेकॉर्ड त्याच्या नावावर अगदी सहज जमा होतो. त्यामुळेच कदाचित त्याला सचिन रेकॉर्डकर असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही.
मैदानावर सचिनची जादू कायम आहेच. शिवाय मैदानाबाहेरही त्याचाच जलवा आहे. राज्यसेभत तो खासदार आहे आणि ऑस्ट्रेलियानं त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियानं सन्मानितही केलंय. क्रिकेटच्या मैदानावर त्यानं आजावर अनेक लाजवाब इनिंग्ज खेळल्यात. मात्र, वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता केवळ टेस्ट क्रिकेटमध्येच त्याच्या बॅटिंगची ट्रिट क्रिकेटप्रेमींना सध्या अनुभवायला मिळतेय.
विक्रमांच्या राशी रचणा-या या विक्रमवीराची बॅट कायम तळपत राहो आणि क्रिकेटप्रेमींना त्याच्या बॅटिंगचा आनंद वारंवार असाचा मिळत राहो अशी अपेक्षा आहे. क्रिकेटच्या या बेताज बादशहाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...