www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
संजय दत्त शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर येईल, तेव्हा बराच काळ निघून गेलेला असेल. दरम्यानच्या काळात संजयनं त्याच्या मालमत्तेच्या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी मान्यताकडे सोपवलीय तर त्याच्याकडच्या स्टाफलाही नोकरी मिळेल, याचीही खबरदारी घेतलीय.
जेलमध्ये किमान साडे तीन वर्षं तरी घालवावी लागणार हे कळल्यावर संजय दत्त पुरता कोलमडून गेला होता. पण हे वास्तव स्वीकारुन त्यानं भविष्यासाठी मॅनेजमेंट सुरू केलं. संजय दत्तनं त्याच्या मालमत्तेची सगळी जबाबदारी सोपवलीय त्याची पत्नी मान्यतावर... संजयच्या मुलांना सांभाळण्यासाठी आणि त्यांना योग्य शिक्षण, सुविधा पुरवण्यासाठी संजयनं त्याच्या विश्वासू लोकांची एक टीम तयार केलीय. ती मान्यताला मदत करेल. वेळप्रसंगी तिला सल्लेही देईल.
स्टाफच्या भविष्यासाठीही केली धडपड
संजय दत्तनं त्याच्या ड्रायव्हर आणि मेकअपमनसह पर्सनल स्टाफमधल्या आठ सदस्यांसाठी इतर ठिकाणी नोकरीसाठीही प्रयत्न केले आहेत. संजयनं स्टाफमधल्या लोकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मेडिकल इन्श्युरन्सही काढलाय. तसंच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या नावावर ठराविक फंडही बँकेत ठेवलाय. जोपर्यंत संजय दत्त जेलमधून बाहेर येत नाही, तोपर्यंत आतापर्यंत त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांना इतरत्र चांगली नोकरी मिळेल, याची काळजी संजयनं घेतलीय. त्यांच्या नोकरीसाठी संजयनं दिग्दर्शक सोहम शहा, अपूर्व लखोटिया आणि बॉलीवूडमधल्या जवळच्या मित्रांशी चर्चाही केली.
संजय दत्तनं त्याची मुलगी त्रिशालासाठीही विशेष योजना करुन ठेवल्या आहेत. जेलमधून सुटल्यानंतर संजयच्या परदेशवाऱ्यांवर बंधनं येण्याची शक्यता आहे. जगभरातल्या नव्वद टक्के देशांमध्ये संजयला बंदी घातली जाऊ शकते. ती शक्यता लक्षात घेऊनच संजयनं आतापासूनच प्रयत्न करायला सुरुवात केलीय. पण संजयला त्याच्या पत्नीपासून, मुलांपासून आणि कुटुंबीयांपासून पुढची तीन वर्षं तरी दूर रहावं लागणार आहे. त्यासाठीची मॅनेजमेंट मात्र संजय दत्तकडे त्यासाठी कुठलाही मॅनेजमेंट प्लान नाही.