www.24taas.com, झी मीडिया, सूरत
प्रसिद्धीच्या कळसावर पोहचलेला हास्य कलाकार कपिल शर्मा याच्या माणुसकीचं दर्शन नुकतंच सूरतमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना झालं.
कपिलच्या लाईव्ह कार्यक्रमासाठी 5000 लोक दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तिथं जवळपास 25,000 लोक जमा झाले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या गोंधळाच्या वातावरणात जवळपास अडीच वर्षांची एका चिमुरडीचा हात सुटला आणि ती आई-वडिलांपासून वेगळी झाली. कपिलला ही मुलगी रडताना आढळली. त्यानं तिला आपल्या ताब्यात घेतलं.
‘ती चिमुरडी खुपच छोटी आणि अबोध होती... तिला नीटसं बोलताही येत नव्हतं. ती फक्त रडत होती... आणि लहान मुलांना रडताना बघणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा हृदयविदारक अनुभव आहे. या चिमुरडीनं मला माझ्या भाचीची आठवण करून दिली... आणि मी मन पाझरलं...’ असं कपिलनं म्हटलंय.
‘मी मुलीला स्टेजवर आणलं आणि तिच्या आई-वडिलांना आवाज दिला. त्याबरोबर तिला धुंडाळतच असलेल्या तिच्या वडिलांनी स्टेजकडे धाव घेतली. मग, मी तिच्या वडिलांना फैलावर घेतलं... त्यांच्याशी असंच बोलायला हवं होतं... एक जबाबदार पिताच एक चांगला माणूस असू शकतो. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या गंभीरतेनं हाताळाव्या लागतील’ असं कपिलनं म्हटलंय.
‘सध्या बिझी शेड्युल असल्यानं लाईव्ह कार्यक्रमांना जास्त वेळ देता येत नाही, परंतु, तसं पाहिलं तर ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ एका लाईव्ह कार्यक्रमासारखाच तर आहे’ असंही यावेळी कपिलनं म्हटलंय. गुजरातमधला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता, असंही कपिलनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.