पहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय

शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.

PTI | Updated: Nov 3, 2014, 06:46 AM IST
पहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय title=

कटक : शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.

भारताने ५ बाद ३६३ अशी दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंका संघाचा डाव ३९.२ षटकांत १९४ धावांत गुंडाळला. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेतर्फे माहेला जयवर्धने (४३), थिसारा परेरा (२९), उपुल थरंगा (२८) व अँजेलो मॅथ्यूज (२३) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. भारतातर्फे ईशांत शर्माने ३४ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. उमेश यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला योग्य साथ दिली.

त्याआधी, सलामीवीर अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारताने आज बाराबती स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्ध दिवस-रात्र खेळल्या जात असलेल्या लढतीत ५ बाद ३६३ धावांची दमदार मजल मारली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. रहाणेने १०८ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व २ षटकारांच्या साह्याने १११ धावांची खेळी केली. रहाणेचे हे वन-डे क्रिकेटमधील दुसरे शतक आहे. धवनने १०७ चेंडूंमध्ये १४ चौकार व ३ षटकारांच्या साह्याने ११३ धावा फटकाविल्या. धवनचे कारकिर्दीतील सहावे, तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्धच्या ११९ धावांच्या खेळीनंतरचे पहिले शतक आहे. या दोन्ही फलंदाजांना अनुभवी यष्टिरक्षक कुमार संगकाराकडून जीवदान मिळाले. त्याचा लाभ घेत या दोन्ही फलंदाजांनी सलामीला २३१ धावांची भागीदारी केली.

सुरेश रैनाने ३४ चेंडूंमध्ये ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावा फटकाविल्या. रैनाने कारकिर्दीतील २०० वा सामना खेळताना अर्धशतकी खेळी करीत वन-डे क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठला. फिरकीपटू अक्षर पटेलने आक्रमक खेळी करताना धम्मिका प्रसादच्या अखेरच्या षटकात २ षटकार ठोकले. अक्षर १४ धावा काढून नाबाद राहिला. भारताने बाराबती स्टेडियममध्ये दुसऱ्यांदा ३०० धावांची वेस ओलांडली. यापूर्वी १९९८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ३ बाद ३०१ धावा फटकाविल्या होत्या.
अलीकडेच आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने मे महिन्यात चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध या मैदानावर ४ बाद २३१ धावा फटकाविल्या होत्या. त्या लढतीत एकूण ४१८ धावा फटकाविल्या गेल्या होत्या.
तातडीने आयोजित करण्यात आलेल्या या दौऱ्यासाठी सज्ज नसल्याचे श्रीलंकेचा कर्णधार मॅथ्यूजने यापूर्वी स्पष्ट केले होते. आज मैदानावर श्रीलंका संघाचे क्षेत्ररक्षण बघितल्यानंतर याची प्रचिती आली. याव्यतिरिक्त लसिथ मलिंगा व रंगना हेराथ यांच्या अनुपस्थितीत श्रीलंका संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले.

माजी कर्णधार कुमार संगकाराने धवन व रहाणे यांना अनुक्रमे १० व ३८ च्या वैयिक्तक धावसंख्येवर जीवदान दिले. त्यामुळे श्रीलंकेचे वेगवान गोलंदाज धम्मिका प्रसाद व लाहिरू गमागे यांना सुरुवातीला प्रभावी मारा केल्यानंतरही लाभ घेता आला नाही. भारताच्या सलामीवीरांना पहिल्या ५ षटकांमध्ये केवळ १४ धावा फटकाविता आल्या होत्या. पहिल्या पॉवर प्लेमध्ये केवळ ४३ धावा फटकाविल्या गेल्या. त्यानंतर रहाणेने आक्रमक फलंदाजी केली. त्याला धवनची योग्य साथ लाभली. रहाणेने ६१ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. २१ व्या षटकात सूरज रणदीवच्या गोलंदाजीवर २१ धावा वसूल करणाऱ्या धवनने ६४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकाविले. रहाणेने ३२ व्या षटकात एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले, तर धवनने सिकुगे प्रसन्नाच्या गोलंदाजीवर मिडविकेटला षटकार ठोकत शतकाला गवसणी घातली. अशान प्रियांजनने धवनला क्लीन बोल्ड करीत श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.